नाशिक : इगतपुरीजवळील बोरटेंभे परिसरात नाशिककडून मुंबईकडे जात असताना दर्शनी भागात भाजीपाला रचून आतील बाजूने गोमांस घेऊन जाणारी पिकअप शनिवारी (दि. १९) रात्रीच्या सुमारास एक्सेल तुटल्याने उलटली. सकाळी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने पिकअप काढण्याचे काम सुरू केले. यावेळी मार्गावरील वाहतूक तासभर खंडित झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र व राज्य शासनाने गोहत्या बंदी घातली असली तरी सर्रास पुणे येथे त्याची छुप्या पद्धतीने वाहतूक सुरू असल्याचे या घटनेच्या निमित्ताने उघडकीस आले. याबाबत गो संरक्षक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप (क्रमांक एम एच ०३- ही पी-३३९७) हे वाहन छुप्या पद्धतीने तीन ते चार टन गोमांस घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना बोरटेंभा शिवारात टेम्पोच्या मागील चाकाचे एक्सेल तुटले. त्यामुळे चाक निखळून टेम्पो एका शेतात उलटला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र वाहन चालक फरार झाला आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गोमांस भरलेली पिकअप शेतातून बाहेर काढण्यासाठी दोन क्रेनचा वापर करण्यात आला. या वेळी वाहतूक काही काळ बंद केल्याने दोन्ही बाजूने एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, इगतपुरी पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून टेम्पो चालकांचा शोध घेतला जात आहे.वर भाजीपाला, आत गोमांससदर वाहनात गोमांस झाकण्यासाठी वर भाजीपाला रचण्यात आला होता. गाडीला अपघात झाल्याने सदर घटना लक्षात आली. अन्यथा हा टेम्पो इप्सित स्थळी पोहोचला असता. गोहत्या बंदी असतानाही सर्रास गोमांसाची छुप्या पद्धतीने वाहतूक करून त्याची विक्री सुरू आहे. प्रामुख्याने मालेगाव, चाळीसगाव, संगमनेर, नाशिक अशा अनेक भागातून हे मांस मुंबईकडे पाठविले जाते. महामार्गावर अनेकदा पोलिसांची नाकाबंदी असतानाही अशी वाहने त्यांच्या नजरेतून सुटतात कशी, असा सवाल गोरक्षकांनी केला आहे.