सिन्नर : नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचऱ्याचे ढीग गेल्या पंधरा दिवसांपासून पेटलेले असून, धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांनी केला. सदर ढिगारे विझविण्याची मागणी उगले यांनी मुख्याधिकारी संजय केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिन्नर-शिर्डी मार्गालगत नगर परिषदेचा घनकचरा व मैला व्यवस्थापन प्रकल्प असून, या ठिकाणी शहरातील संपूर्ण कचरा आणून त्याची विल्हेवाट लावली जाते. घनकचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्पही मंजूर आहे. मात्र नगर परिषदेकडून कचऱ्याची योग्यरीतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचे उपनगराध्यक्ष उगले यांचे म्हणणे आहे. पालिकेने याची गंभीर दखल घेऊन कचरा डेपोला लागलेली आग पूर्णत: विझवावी तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावताना योग्य ती काळजी घ्यावी, अशी मागणी उगले यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी तसेच प्रदूषण महामंडळाला पाठविण्यात आल्याचे उगले यांनी म्हटले आहे.
१ मार्च रोजी पुन्हा मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनला बसून पेटलेल्या कचरा डेपोविषयी चर्चा झाली. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी परत पाण्याचे बंब कचरा डेपोवर पाठविले. अग्निशमन दलाने आग विझवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतु अद्यापही कचरा डेपो पेटलेलाच आहे. त्यामधून निघणारा धूर हा अतिशय घातक स्वरूपाचा व प्रदूषण वाढविणारा असल्याचे उगले यांनी म्हटले आहे.
------
सिन्नर येथील नगर परिषदेच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीतून निघणारा धूर. (१५ सिन्नर १)
===Photopath===
150321\15nsk_25_15032021_13.jpg
===Caption===
१५ सिन्नर १