पाटोदा : शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या कोणत्याच पिकाला दर मिळत नसल्याने भाजीपाला रस्त्याच्या कडेला फेकून देत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे ठिकठिकाणी टोमॅटो, शिमला मिरची, डांगर, भोपळे, कारले, कोबी, फ्लॉवर व भाजीपाल्याचे लाल, हिरवे डोंगर दिसत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारी व निसर्गाशी दोन हात करीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेतले. मात्र पाऊस व वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकांवर करपा, फळकुज, तिरंगा, फळांना तडे जाणे, तसेच मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून तसेच महागडी औषधे व कीटकनाशकांची फवारणी करून पिके जगवली, मात्र आता याच मालाला दमडीच्या भावातही कुणी घ्यायला तयार नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकाला फेकून देण्याची वेळ आली आहे. शेतमाल तोडण्याची मजुरी तसेच भाजीपाला वाहतुकीसाठी आलेला खर्चही शेतकऱ्यांना खिशातून करावा लागत असल्याने आर्थिक कोंडी झाली असून, खते व औषधांच्या उधारीचे पैसे कसे फेडायचे, हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
--------------------
बाजारभाव कोसळण्याची कारणे
मागील वर्षी शेतमाल व भाजीपाला उत्पादनातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाची लागवड केली. पावसाचे प्रमाणही कमी असल्याने नुकसान कमी झाले, त्यामुळे उत्पादन वाढले असून, एकाच वेळी आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर कोसळले असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.
..........................................
पोटच्या मुलांप्रमाणे जीव लावून भाजीपाला उत्पादन घेतले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. या उत्पन्नातून मुलांच्या शिक्षण, शेतीसाठी भांडवल व घर खर्चासाठी पैसे उपलब्ध होतील, अशी आशा होती. मात्र हातातोंडाशी आलेला घास दर कोसळल्यामुळे हिरावला गेला असून, मोठी निराशा झाली आहे. मजूर, गाडीभाडे, तसेच औषध दुकानदारांची देणी देणे अवघड होऊन बसले आहे.
- ज्ञानेश्वर बोरनारे, शेतकरी, पाटोदा (२६ पाटोदा १/२)
260821\26nsk_13_26082021_13.jpg
२६पाटोदा १/२