श्याम बागुल नाशिक : ओझर विमानतळावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्यावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला. दोघांनीही आवाज चढविल्याने विमानतळावर तणाव निर्माण झाला.
सुरक्षा दलाने माफी मागावी अन्यथा विमान न चालविण्याचा निर्णय पायलटने घेतला. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अखेर राहुल गांधी यांनी दोघांचीही समजूत घालून स्वत: दिलगिरी व्यक्त करण्याचा इरादा बोलून दाखविल्यावर दोन्ही बाजूने नरमाईची भूमिका घेण्यात येऊन तणाव निवळला. साधारणत: अर्धातास गांधी यांनी विमानतळावर घालविल्यानंतर ते दिल्लीकडे रवाना झाले.
शनिवारी सकाळी सात वाजेपासूनच ओझर विमानतळावर विशेष सुरक्षा दल व पोलीस यंत्रणा उपस्थित होती. राहुल गांधी ओझर येथे येण्यापूर्वी काही वेळ अगोदर त्यांच्या विमानाचे पायलट विमानतळावर पोहोचले. त्यावेळी तेथे तैनात एसपीजीने पायलटकडे असलेल्या बॅगेची तपासणी करण्यावरून वाद झाला. मी चार वर्षांपासून गांधींच्या विमानाचा पायलट असून, आजवर असा अनुभव आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झडला. थोड्याच वेळात राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टरचे लँडिंग झाले. त्यांना शहराध्यक्ष शरद आहेर यांनी वादाची कल्पना दिली. त्यांनी एसपीजी अधिकारी व पायलट यांच्याशी संवाद साधला. अखेर वादावर पडदा टाकण्यात आला.
अग्निशामन वाहनात बसलेविमान उड्डाण घेण्यासाठी वीस मिनिटांचा कालावधी शिल्लक असल्याचे पाहून राहुल गांधी यांचे कोपऱ्यात एचएएलच्या अग्निशामक दलाच्या पथकाकडे लक्ष गेले. ते चालत तेथे गेले. त्यांनी थेट अग्निशामक दलाच्या बंबावर चढून आतमध्ये बसलेल्या चालक व जवानाशी संवाद साधला.