दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, ग्रामीण विकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे राबविण्यात येणाऱ्या या अभियानात शासनाने नाशिक जिल्ह्यातील १० हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची निवड केली होती. १ जानेवारी ते १५ मे २०२० या कालावधीत पंचतत्त्वावर आधारित कामे ग्रामपंचायतींमध्ये करण्यात आली. या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतींचा आराखडा तयार करून ग्रामपंचायतींसाठी जिल्हा व तालुकास्तरावरून संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी संनियंत्रण केले. पहिल्या टप्प्यात सर्व १३ ग्रामपंचायतींची काम शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत व येवला तालुक्यातील नगरसूल ग्रामपंचायतीची प्रत्यक्ष तपासणीसाठी निवड करण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने प्रत्यक्ष तपासणी न करता ऑनलाइन पध्दतीने ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून सादरीकरण व सर्व कामांची ऑनलाइन पाहणी करून माहिती घेण्यात आली. यामध्ये निफाड तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम केल्याने सदरची ग्रामपंचायतीने या अभियानात राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळविला आहे. पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका अशोक बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी लोकसहभागातून उत्कृष्ट काम केल्याने गावाचा पुरस्कार प्राप्त झाला.