इंदिरानगर : पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने संपूर्ण रस्ताच चिखलात रुतला असून, गावातील नागरिकांना व वाहनधारकांना चिखल तुडवत मार्गक्रमण करावे लागत आहे.पिंपळगाव खांब या गावात शेतकरी व कामगारवस्ती म्हणून ओळखले जाते सुमारे चार हजार लोकांची वस्ती आहे. गावातील विद्यार्थी वर्ग, शेतकरी व कामगार यांना शहरात हे जा-ये करण्यासाठी पिंपळगाव खांब ते पिंपळगाव खांब फाटा मुख्य रस्ता आहे. परंतु सुमारे दीड वर्षांपूर्वी पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब या रस्त्याचे खोदकाम करून भूमिगत गटारीचे पाइपलाइन टाकण्यात आले आणि रस्ता थातूरमातूर पद्धतीने बुजविण्यात आला. शुक्रवार (दि.१२) झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे डबके व चिखल झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शहरात ये-जा करण्यासाठी चिखल तुडवत आणि पाण्याचे डबके चुकवीत वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागते आहे. त्यामुळे वाहन घसरून लहान-मोठे अपघात घडत असून, ग्रामस्थांनी तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.
पिंपळगाव खांब रस्ता चिखलात रुतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:14 AM