पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील कांद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथे गाड्या लोडिंग करणाऱ्या कामगारांच्या संपानंतर कांद्याच्या बाजारभावात २०० रुपयांनी वाढ झाली. ४५०० रुपयांचा भाव जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
माथाडी कामगारांनी संप पुकारल्याने कांद्याचे लिलाव दोन दिवस ठप्प झाले होते. मात्र आयुक्त आणि आमदार दिलीप बनकर यांच्या मध्यस्थीने शुक्रवारपासून हे लिलाव सुरू झाले. आशिया खंडात नावाजलेल्या पिंपळगाव बाजार समितीत रोज कांद्याची कोट्यवधीची उलाढाल होत असते. त्यामुळे मागील महिन्याच्या २१ व २२ ऑक्टोबर रोजी काही कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले होते. त्या कारवाईमुळे प्रतिक्विंटल ४५०० पर्यंत गेलेल्या उन्हाळ कांद्याचे दर अवघ्या चारच दिवसांत १ हजार रुपयांपर्यंत खाली आले. कांद्याचे दर गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराज व्यक्त केली आहे. मात्र हळूहळू कांद्याचे दर सुधारत होते. ते ४३०० रुपयांपर्यंत कमी झाले होते. त्यातच कामगारांनी संप पुकारल्याने कांद्याची मोठी कोंडी निर्माण झाली होती. मात्र संप मिटताच पुन्हा कांद्यात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शुक्रवारी बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त ४५००, कमीत कमी १५००, तर सरासरी २५०० रुपये भाव मिळाला. कांद्याची आवक ४८७ ट्रॅक्टर व ३६६ जीपमधून झाली.