पिंपळगाव बसवंत : शहरातून चार-पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरून चोरीस गेलेल्या पीकअप वाहनांचा शोध लावण्यात पिंपळगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सिन्नर हद्दीत लावलेल्या ट्रॅपमध्ये हे वाहन आढळल्याने एका आरोपीस जेरबंद करण्यात आले आले, तर दुसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्यांच्याकडून पिकअप वाहनासह चोरीच्या २१ बॅटऱ्या असा जवळपास साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पिंपळगाव शहरातील प्रकाश वडजे यांच्या मालकीचे पिकअप वाहन (एम. एच. ०१ डीएस २६७८) घरासमोरून रविवारी (दि.२६) मध्यरात्री चोरीस गेले होते. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पी. के. निकम यांनी सर्व टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार चोरीस गेलेले वाहन सिन्नर हद्दीतच असल्याचे निष्पन्न झाल्याने शिंदे पळशे टोलनाक्यावर लावलेल्या ट्रॅपमध्ये हे वाहन सापडले. यात आरोपी दिलीप रामदास यादव (२५, रा. अहिल्यानगर उत्तर प्रदेश) यास अटक करण्यात यश आले तर घटनास्थळावरून एक आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपीस खाकी खाक्या दाखवताच आरोपीने चोरीच्या उद्देशाने पिकअप चोरी केल्याची कबुली दिली. शिवाय आरोपींनी चारचाकी वाहनासह चोरलेल्या २१ बॅटऱ्या असा जवळपास साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पथकात पो. ह. मिथुन घोडके, पप्पू देवरे, संदीप दराडे, गोकूळ खैरनार, नितीन जाधव, आदींचा समावेश होता