पिंपळगाव बसवंत : परिसरातील टोलनाक्यालगत असलेल्या साकोरे फाट्याजवळ पुठ्ठ्याने भरलेल्या ट्रकला गुरुवार, दि. २७ रोजी रात्री बारा ते एकच्या दरम्यान अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. काही महिन्यांपूर्वी याच परिसरात पेट घेतलेल्या बर्निंग कारच्या थराराची पुन्हा आठवण नागरिकांना झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रकमधील मालाचे पूर्णपणे नुकसान झाले. तत्काळ घटनास्थळी अग्निशामक पथक पोहोचल्याने अधिक नुकसान टळले.
पिंपळगावच्या टोलनाका परिसरातील कोकणगाव शिवारात असलेल्या साकोरे फाट्याजवळ पुठ्ठ्याने भरलेल्या पिंपळगावाहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच ०५.१६११ क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकने प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट होऊन पेट घेतला असल्याची माहिती महामार्ग व पिंपळगाव पोलीस प्रशासनाला मिळाली. त्यांनी तत्काळ ओझर एच.ए.एल व पिंपळगाव अग्निशामक प्रशासनाला घटनेची माहिती दिली. तातडीने अग्निशामक प्रशासनाच्या चार ते पाच बंबांसह अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल झाले व अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये व सुरक्षित वाहनांना प्रवास मिळावा, यासाठी महामार्ग पोलीस पथक व पिंपळगाव पोलीस प्रशासनाचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. (२८ पिंपळगाव १/२)
===Photopath===
280521\28nsk_8_28052021_13.jpg
===Caption===
२८ पिंपळगाव १