पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून काल रात्री बिबट्याने प्रकाश कडू जाधव यांच्या मळ्यातील राहत्या घराजवळील गोठ्यातील शेळीचा फडशा पाडला असून, एका शेळीला जखमी केले आहे. त्यामुळे शिवारात वास्तव्यास असलेले शेतकरी बांधव शेतमजूर, हे बिबट्याच्या वास्तव्याने धास्तावले आहेत. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून सदर बिबट्या हा जेरबंद करावा अशी मागणी पिळकोस येथील शेतकरी बांधवांकडून आणि पशुपालकांकडून होत आहे.वनपाल आर. एस. गुंजाळ व वनमजूर कैलास गांगुर्डे यांनी पिळकोस येथे येऊन मृत व जखमी शेळीचा पंचनामा करून परिसराची पाहणी करून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा, बल्ब लावण्याचा व परिसरात मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्याच्या सूचना केल्या आहेत. पशुवैद्यकीय डॉ. व्ही. एस. अहेर यांनी शेळीचे शवविच्छेदन करून वनविभागाला अहवाल दिला आहे. परिसरात बिबट्या येण्याचे प्रमाण हे आठ वर्षांपासून वाढले असल्याने या कालावधीत पिळकोस परिसरातील शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.परिसरात पुन्हा बिबट्याने धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस कांदा पिकाला पाणी देण्यासाठी जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस परिसर हा बिबट्याच्या डरकाळ्यांनी दणाणून निघत असून, शेतकरी, पशुपालक व शिवारातील वास्तव्यास असलेले ग्रामस्थ हे बिबट्याच्या दहशतीने धास्तावले आहेत. बिबट्याच्या उपद्रवामुळे मेंढपाळांनी पिळकोस परिसरातून स्थलांतरित होण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)
पिळकोसला बिबट्याचा धुमाकूळ
By admin | Published: February 12, 2017 11:52 PM