उमराणे : येथील जाणता राजा मंडळातर्फे शिवकालीन स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक निंबाळकर यांच्या स्मरणार्थ गणपती मंदिर ते धनदाई माता मंदिर या बाह्यवळण रस्त्यावर मुरूम टाकून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.कसमादे परिसरातून शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीकडे जाणा-या वाहनांना गावातील अरुंद रस्त्यांनी जावे लागत होते. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन सन २००५ साली शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन या वाहनांसाठी बाह्य वळण रस्ता निर्मितीतून धनदाई माता मंदिर ते गणपती मंदिर असा परसूल नदीकाठाने नवीन रस्ता तयार करून देण्यात आला.
परिणामी या नवीन तयार झालेल्या रस्त्यामुळे बाजार समितीकडे जाणारी सर्व वाहने गावाबाहेरून जाऊ लागल्याने नागरिकांची वाहनाच्या त्रासापासून सुटका झाली. परंतु चालू वर्षी जास्त पावसामुळे नदीच्या पुराचे प्रमाण अधिक असल्याने पूर पाण्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन छोटे-मोठे अपघातांचे प्रमाण वाढलेले होते.
ही बाब लक्षात घेऊन जाणता राजा मित्रमंडळातर्फे शिवकालीन स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक निंबाळकर यांच्या स्मरणार्थ गणपती मंदिर ते धनदाई माता मंदिर या एक ते दीड कि.मी.च्या बाह्यवळण रस्ता दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेऊन पूर्ण केले आहे. शासकीय अंदाज पत्रकानुसार तीन लाख रुपये खर्चाचे काम मंडळाने सामाजिक बांधिलकी जपून केल्याने जाणता राजा मंडळाच्या कामाबाबत उमराणे व परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.गेल्या २००५ सालापासून शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून रायगड किल्ल्याचे शिवकालीन स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर रस्ता दुरुस्ती अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत मंडळाच्या वतीने उमराणेसह परिसरातील बहुतांशी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम कुठलाही शासकीय निधी न वापरता मंडळाने स्वखर्चाने केले आहे. - नंदन देवरे, अध्यक्ष, जाणता राजा मंंडळ