नाशिक : कॉलेज रोडवरील विठ्ठल मंदिराकडून बॉईज टाऊनकडे जाणाऱ्या अंतर्गत कॉलनी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या अजस्त्र अशा पिंपळवृक्षाचा निम्मा भाग रविवारी (दि.२०) रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानकपणे फॉर्च्युनर (एम.एच१५ सीटी ३९००) कोसळल्याने कारचा चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत सुदैवाने बापलेक बालंबाल बचावल्याने झोपे कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
कॉलेज रोडकडून कृषीनगर जॉगिंग ट्रॅकच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी श्रीरामलीला बंगल्यासमोर पिंपळाचा मोठा वृक्ष आहे. वर्षानुवर्षे जुना असलेल्या या वृक्षाच्या बुंध्याजवळ संकेत झोपे यांनी त्यांची मोटार उभी केली आणि ते त्यांच्या बंगल्याचे प्रवेशद्वार उघडण्यासाठी तीन वर्षांच्या मुलाला घेऊन कारमधून उतरले. बंगल्याचे गेट सरकावून आत जात नाही तोच मोठा आवाज झाला आणि परिसरात सर्वत्र अंधार पसरला. पिंपळाच्या झाडाची निम्मी बाजू पूर्णपणे मोटारीवर कोसळली. बुंध्यापासून वाढलेली मोठी फांदी कारवर आदळल्याने कारचा चक्काचूर झाला.
संकेत झोपे हे त्यांच्या कुटुंबीयांसह त्र्यंबकेश्वर येथून रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी परतले. कारमधून ते त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन खाली उतरले आणि त्यांच्या बंगल्याचे मुख्य गेट उघडण्यासाठी गेले. यावेळी त्यांची कार पिंपळाच्या झाडाच्या बुंध्यापासून सुमारे पन्नास फुटांवर मध्यभागी उभी केलेली होती. बंगल्याचे गेट उघडत नाही तोच झाडाची भली मोठी जाड फांदी कारवर कोसळली. यामुळे विद्युततारांवरदेखील लहान फांद्या पडल्या आणि पोलही एका बाजूला कलला. विसे मळा, येवलेकर मळा, कॉलेज रोड हा संपूर्ण परिसर अंधारात हरविला. झोपे यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली तेथून अग्निशमन दलाला माहिती साडेनऊ वाजेच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच शिंगाडा तलाव मुख्यालयातून जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. झाड मोठे असल्याने अतिरिक्त मदत म्हणून सातपूर येथूनही दुसरा बंब व जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. झाडांच्या फांद्या कापून मोटार बाजूला करण्यासाठी जवानांना सुमारे तासाभरापेक्षा अधिक वेळ लागला. दैव बलवत्तर असल्याने झोपे व त्यांचा चिमुकला या दुर्घटनेत बचावले.
--इन्फो--
तीन ते चार वेळा अर्ज
झाडाचा धोकादायक झालेला भाग उतरवून घ्यावा व फांद्यांची छाटणी करावी यासाठी या भागातील रहिवाशांनी मनपा प्रशासनाकडे तीन ते चार वेळा अर्ज केले आहेत; मात्र मनपा प्रशासनाने याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता असे येथील नागरिकांनी सांगितले.
--कोट--
मी त्र्यंबकेश्वर येथून आलो. बंगल्याचे गेट उघडण्यासाठी मुलाला घेऊन कारमधून खाली उतरलो आणि गेट उघडत नाही तोच झाडाचा भला मोठा भाग कारवर कोसळला. माझे नशीब चांगले आणि परमेश्वराची कृपा झाली म्हणून मी आणि माझा मुलगा बचावलो. मनपा प्रशासनाने धोकादायक झाडे काढून घेणे गरजेचे आहे.