नाशिक : दोन दिवसांपासून शहराच्या किमान तपमानात सुमारे सहा अंशांनी घट झाली असून, सकाळी व सायंकाळी गारवा जाणवत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर थंडीची चाहूल लागली असून, दिवसेंदिवस थंडीत वाढ होणार असल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले. नवरात्रोत्सवानंतर ‘आॅक्टोबर हीट’ची तीव्रता कमी होऊन हळूहळू थंडीची चाहूल लागते. विशेषत: दिवाळी आणि थंडीचे अतूट नाते आहे. दिवाळीतील पहाटेचे अभ्यंगस्नान गुलाबी थंडीच्या साक्षीनेच केले जाते. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने थंडीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती; मात्र नाशिककरांना दिवाळीपूर्वी थंडीची चाहूल लागली आहे. दोन दिवसांपासून पहाटे व रात्री वातावरणात चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. २६ आॅक्टोबर रोजी शहराचे कमाल तपमान २९.३, तर किमान तपमान २०.३ अंश सेल्सिअस होते, शुक्रवारी कमाल तपमान साधारणत: तेवढेच (३० अंश सेल्सिअस) असले, तरी किमान तपमान मात्र सुमारे ६ अंशांनी घसरून १४.९ अंश इतके नोंदवले गेले. कमाल तपमान घटल्याने थंडीने आपल्या आगमनाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे रात्री व पहाटे नागरिक ऊबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. कानटोप्या, कानपट्ट्यांच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, नैऋत्य अरबी समुद्रावर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वातावरण ढगाळ झाल्यास थंडीच्या तीव्रतेवर परिणाम होतो. यंदा तसे न घडल्यास दिवसेंदिवस थंडीच्या प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
गुलाबी थंडीची चाहूल
By admin | Published: October 30, 2015 11:59 PM