नाशिक : महापालिकेच्या वतीने पिंपळगाव खांब मलनिस्सारण केंद्रासाठी जागेच्या अधिग्रहणाची प्रक्रिया महिनाभरात राबविली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. दरम्यान, शासनाने अमृत अभियानांतर्गत पिंपळगाव खांब एसटीपीसाठी एकूण ५३.४६ कोटी रुपयांच्या प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यातील २६.७३ कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून प्राप्त होणार असून, उर्वरित आॅपरेशन-मेंटेनन्ससह लागणारा सुमारे ३३.१३ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला उभा करावा लागणार आहे.पिंपळगाव खांब येथे ५ हेक्टर जागेत ३२ एमएलडीचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पास अमृत योजनेंतर्गत निधी प्राप्त होणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने या प्रकल्पाचा ६३ कोटी रुपयांचा डीपीआर तयार करून तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्यानुसार, पिंपळगाव खांब येथे केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत ३२ एमएलडी क्षमतेचा मलनिस्सारण प्रकल्प साकारण्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली होती. आता महापालिकेच्या प्राकलनातील ६३ कोटी रुपयांपैकी ५३.४६ कोटी रुपयांना शासनाने नुकतीच प्रशासकीय मान्यताही दिली आहे. मलनिस्सारण टप्पा क्रमांक २ नुसार पिंपळगाव खांब एसटीपीचे काम केले जाणार असून, ५३.४६ कोटी रुपयांमध्ये केंद्र शासनाचा ३३.३३ टक्के म्हणजे १७.८२ कोटी रुपये हिस्सा असणार आहे तर राज्य शासनाचा १६.६७ टक्के म्हणजे ८.९१ कोटी रुपये हिस्सा राहणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी म्हणजे २६.७३ कोटी रुपये महापालिकेला स्वनिधीतून उभे करावे लागणार आहेत. एकीकडे शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली असताना भूसंपादनाचा तिढा मात्र अजून सुटलेला नाही. मात्र, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी कोणत्याही स्थितीत महिनाभरात जागा अधिग्रहणाची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन महिन्यांमध्ये निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्याचे सूतोवाच आयुक्तांनी केले आहे.