लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मुंबईच्या धर्तीवर नाशकातदेखील नजीकच्या काळात घरोघरी थेट पाइपलाइनने गॅसपुरवठा करण्यासाठीची योजना आकार घेत आहे. या योजनेंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात ३५ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार असून, येत्या आठवड्यात या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पालघरच्या प्रकल्पातून थेट पाइपलाइनद्वारे नाशिकला गॅसपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी गॅसचा साठा करण्यासाठी विल्होळीत स्टेशन उभारण्यात येणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात ३५ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम पालघर ते नाशिक पाइपलाइनचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी २५० किलोमीटरची पाइपलाइन टाकली जाणार आहे. या कामासाठी करण्यात आलेले सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. नाशिकमधील पाइपलाइनच्या कामकाजासाठी रोड डॅमेज चार्जेस म्हणून ८ कोटी रुपये कंपनीकडून महापालिकेला अदा करण्यात आले आहेत. तसेच महानगराच्या ज्या भागात खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, त्या परिसरात कंपनीने त्वरित काम सुरू करण्याचे निर्देशदेखील महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. कंपनीने नुकतेच जेल रोड आणि शिंदे, पळसे तसेच पाथर्डी फाटा येथे सीएनजी पंपाच्या कामकाजाला प्रारंभ केला आहे. त्याशिवाय महानगरात अन्यत्र काही ठिकाणी सीएनजी पंप उभारण्याच्या कामालादेखील गती देण्यात येणार आहे.
इन्फो
मनपाच्या शहर बससाठी सुविधा
महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या शहर बससेवेसाठी महापालिकेच्या जागेत पाच सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मनपाच्या भविष्यातील शहर बससेवेसाठीदेखील हक्काच्या इंधनाची सोय होऊ शकणार आहे.