आर्थिक नियोजन कोलमडले
नाशिक : सततच्या बंदमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले असून, अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. मजुरांची कामे बंद असल्यामुळे अनेकांना घरभाडे देता आलेले नाही. त्यामुळे घरमालकांचे नियोजन कोलमडले असून, त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कोरोना काळातही जनसंपर्क सुरुच
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी कोरोना काळातही जनसंपर्काची संधी शोधली असून, लसीकरण केंद्र, चाचणी केंद्र याठिकाणी इच्छुकांचा वावर वाढला आहे. काही ठिकाणी विद्यमान नगसेवकांचे नातेवाईकही उपस्थित राहात असल्याचे पाहायला मिळते.
विद्यार्थ्यांचे नियोजन कोलमडले
नाशिक : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला आहे. परीक्षा उशिरा होणार असल्याने पुढील सर्वच प्रक्रिया उशिराने होणार असल्याने अनेकांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त
नाशिक : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोनामुळे आधीच कंपन्यांनी वेतन कपात केली आहे. त्याचा फटका सहन करत असतानाच महागाईने डोके वर काढल्याने अनेकांचे बँकांचे हप्ते थकले आहेत.
ग्रामीण भागात खरिपाची तयारी
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खरिपाची तयारी सुरु झाली असून, जमिनीच्या नांगरणी कामात शेतकरी व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठल्याने उन्हाळी पिकांना पाणी देणेही शक्य होत नसल्याने काहींनी उन्हाळी पीक सोडून देणे पसंत केले आहे.
किमान पंधरा दिवस घरात राहणे आवश्यक
नाशिक : रुग्णालयांमध्ये जागा मिळत नसल्याने अनेक रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. अशा रुग्णांनी किमान १५ दिवस घराबाहेर पडू नये, असे अपेक्षित असताना काही रुग्ण बाहेर पडत असल्याने धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांनी शोधला पर्याय
नाशिक : गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षा आणि बसचालकांना पर्यायी रोजगार शोधावा लागला आहे. अनेक चालकांनी भाजीपाला, फळ विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यातच पोलीस रस्त्यावर बसू देत नसल्याने व्यवसाय कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमाेर निर्माण झाला आहे.
पाण्यासाठी महिलांची भटकंती
नाशिक : ग्रामीण भागात काही गावांमध्ये विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी टँकर सुरु झाले असले, तरी काही ठिकाणी अद्याप टँकर सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.
क्लासचालकांची डाेकेदुखी वाढली
नाशिक : दहावी, बारावीची परीक्षा लांबल्याने खासगी क्लास चालकांची डोकेदुखी वाढली आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात परीक्षा संपत असल्याने क्लास चालकांना पुढील वर्षाचे नियोजन करता येते. यावर्षी परीक्षा लांबल्याने तोपर्यंत त्यांना क्लास घ्यावे लागणार असल्याने त्याचा नियोजनावर परिणाम झाला आहे.