मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामदैवत पीरसाहेब यात्रोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पहिल्या दिवशी सकाळी देवतेला अभिषेक करण्यात आले. त्यानंतर गावातील खंडोबा भक्त लालजी सावंत यांनी बारा गाड्या ओढल्या. रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले होते. सुटीच्या दिवशी यात्रा आल्याने बच्चे कंपनी आणि अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने माहेरी आलेल्या सासुरवाशिणी यांनी मनमुराद आनंद लुटला. गावातील श्रीराम मंदिर चौकात मोठी यात्रा भरली होती. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची मोठी दंगल झाली. यात परिसरातील मल्लांनी हजेरी लावली. रंगतदार अवस्थेत झालेल्या अखेरच्या लढतीमधील मल्लांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. लोकवर्गणीतून दरवर्षी हा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी यात्रोत्सवाची रंगत आणि उत्साह वाढतच आहे. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी सरपंच दयाराम सावंत, उपसरपंच लालजी सावंत, प्रकाश पानसरे, शंकर सावंत, बापू सावंत आणि यात्रा कमिटी यांनी विशेष परिश्रम घेतले.
डोंगरगाव येथे पीरसाहेब यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:19 AM