लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : तालुक्यातील ताहाराबाद परिसरातील रस्त्यांची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभागाने वर्दळीच्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.मागील वर्षाप्रमाणे यंदा पावसाने सुरुवातीपासूनच जोर धरल्याने ताहाराबाद - द्वारकाधीश कारखाना-मार्गे शेवरे, मांगीतुंगी, अंतापूर रस्ता व मांगीतुंगी फाटा ते पिंपळकोठे- दरेगाव नांदीन रस्ता तसेच साल्हेर - मुल्हेर आदिवासी पश्चिम भागातील रस्ते, पूल, फरशा, साइडपट्ट्या अतिवृष्टी पावसामुळे खराब झाल्याने लहान मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन तातडीने सदर रस्त्यांची दुरुस्ती करून पक्के काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.याचबरोबर ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था झाली असून, डोंगरावरील पाणी रस्त्यावरून खाली वाहत असल्याने शेती व शेतीपिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ काम न केल्यास रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा जगन्नाथ साळवे, संजय नेरकर, बापू नेरकर, शुभम साळवे, मुन्ना गांगुर्डे, काळू नाईक, विठ्ठल नाईक, दिलीप माळी, बापू मोरे, लीलाबाई नाईक यांनी दिला आहे.
ताहाराबाद गटातील रस्त्यांची दुरु स्ती करण्याबाबत प्रयत्नशील असून, नाशिक जिल्हा परिषद माध्यमातून त्वरित कामे करण्यात येतील.- रेखा पवार, जिल्हा परिषद सदस्य, ताहाराबाद गट