सुनील गायकवाड, लोकमत न्यूज नेटवर्क, येवला (जि. नाशिक): रामलल्लाच्या मूर्तीसाठी येवला येथील पैठणी कलाकारांनी शेला आणि पितांबर तयार केला असून, ते रामलल्लासाठी पाठविण्यात येणार आहे. कापसे फाउंडेशन २५१ किलो गाईचे तूपही पाठविणार आहे. पितांबर, शेल्यासाठी लागणारा धागा नैसर्गिक रंग तयार करून साकारण्यात आला आहे. वडगाव येथील कापसे फाउंडेशनच्या दिव्यांग कारागिराकडून हाताने शेला आणि पितांबर बनविण्याचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. या ठिकाणी शेला व वस्त्राचे दर्शन घेण्यासाठी नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक गर्दी करीत आहेत.
होमसाठी साहित्य पाठविणार
कापसे फाउंडेशनचा सुमारे ४०० गीर गाईंचा प्रकल्प असून या गाईंच्या दुधापासून तयार केलेले २५१ किलो तूप हेदेखील अयोध्येत होणाऱ्या होमहवनासाठी पाठवले जाणार आहे. याशिवाय गीर गाईंच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोवऱ्या, पणत्या, शेणाची वीट आणि इतर साहित्यदेखील पाठवले जाणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे यांनी दिली आहे.
५५ देशांमध्ये २२ जानेवारीला होणार प्रार्थना कार्यक्रम
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भारतातच नव्हे तर विदेशातही विविध कार्यक्रमांचे आयोजन विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) केले आहे. जगभरातील ५५ देशांमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी प्रार्थना कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. विदेशात विहिंप तर्फे आयोजिण्यात येणाऱ्या प्रार्थना कार्यक्रमांत आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील लोक, म्यानमार, युरोप आदी अनेक ठिकाणचे हिंदू सहभागी होणार आहेत. ज्या लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे त्यांनाही आवर्जून या प्रार्थना कार्यक्रमांत सहभागी करून घेतले जाईल. विहिंपचे सहसचिव स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले की, प्रार्थना कार्यक्रमांत विदेशातील हिंदूंना जास्तीत जास्त संख्येने समाविष्ट करून घेतले जाईल.
राम मंदिरात २४०० किलो वजनाची घंटा; आवाज १० किलोमीटर पर्यंत ऐकू येईल!
अयोध्येतील भव्यदिव्य प्रभू श्री राम मंदिरात तब्बल २४०० किलो वजनाची घंटा बसविण्यात येणार आहे. या घंटेचा आवाज १० किलोमीटरपर्यंत ऐकू येईल. उत्तर प्रदेशच्या ऐटा जिल्ह्यामधील जलेसर हे पितळ व अन्य काही धातूंपासून वस्तू बनवण्याकरिता जगप्रसिद्ध गाव आहे. विशेषतः मंदिरांमधील घंटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात. देशातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये येथील घंटा आहेत. जलेसरच्या रामभक्तांनी ही घंटा अयोध्येतील राम मंदिरासाठी खास बनवली आहे. २४०० किलोंच्या मुख्य घंटेव्यतिरिक्त ५१ किलोंच्या सात घंटादेखील भेट देण्यात आल्या. या घंटांमध्ये कुठेही जोडकाम केलेले नाही. अखंड धातूपासून त्या बनवण्यात आल्या आहेत. जलेसरचे आदित्य मित्तल, मनोज, रिशांक, प्रशांत मित्तल हे ५०० रामभक्तांसह अयोध्येला पोहोचले. त्यांनी कारसेवकपुरम येथे श्रीराम मंदिर ट्रस्टचे महामंत्री चम्पतराय, विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक दिनेश चंद्र, राजेंद्र सिंह पंकज यांच्याकडे घंटा सुपूर्द केल्या आहेत.