नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी स्थळाची दयनीय अवस्था आहे़ गेली २३ वर्षांपासून येथील विश्वस्त मंडळाची निवडणूक झालेली नाही, तर कार्यरत विश्वस्तांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून लूट केली आहे़ या सर्वांची चौकशी व विश्वस्त मंडळाची निवडणूक करण्याची मागणी वारकरी मंडळाने केली आहे़ ही मागणी पूर्ण करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येऊन १५ जानेवारीला निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त होणारी निवृत्तिनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा रोखणार असल्याची भूमिका वारकरी मंडळ व छावा संघटनेने घेतली असल्याची माहिती वारकरी मंडळाचे पुंडलिक थेटे, त्र्यंबकराव गायकवाड व छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली़ पुंडलीक थेटे यांनी सांगितले, १९५४मध्ये निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर संस्थान नावाने ट्रस्टची प्रथम नोंद झाली आहे; परंतु त्यामध्ये योग्य बदल करून १९९१ मध्ये निवृत्तिनाथ महाराज देवस्थानची धर्मदाय आयुक्तांकडे नोंद करण्यात आली़ तेव्हा निवड झालेले ११ विश्वस्तांच्या मंडळाची १९९५ला मुदत संपली; परंतु यानंतर विश्वस्त मंडळाची निवडणूक झालीच नाही़ यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया आल्याने आहे तेच मंडळ गेली २३ वर्षांपासून कार्यरत आहे़ निवृत्तिनाथ महाराज देवस्थानला भाविकांचे दान व देणगीतून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते़ तसेच पंढरपूर पालखी सोहळ्यात ६० लाखांपेक्षा अधिक रक्कम व पाच ट्रक धान्य मिळते़ शासनाकडून देवस्थानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध होतो़ मात्र या विश्वस्त मंडळाने कसलेही लेखापरीक्षण केले नाही़ तसेच या रकमेची माहिती प्रसिद्ध केलेली नाही़ शासकीय पातळीवर मागण्यांची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी अन्यथा १५ जानेवारीला होणाऱ्या निवृत्तिनाथ महाराज यात्रेवेळी सर्व वारकरी व छावा संघटनेचे कार्यकर्ते तीव्र आंदोलन करणार आहेत़ तसेच शासकीय महापूजा होऊ दिली जाणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी स्थळाची दयनीय अवस्था
By admin | Published: December 08, 2014 1:16 AM