शहरात रस्त्यांवर मोकाट जनावरे वाढली
नाशिक : पंचवटीतील रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. पंचवटीच्या विविध भागातील भाजी बाजारातील उर्वरित भाजीपाल्याची आणि शिळे अन्न मोठ्या प्रमाणात उघड्यावर टाकले जात असल्याने पुन्हा शहरात मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पडीक उद्याने बनली मद्यपींचा अड्डा
नाशिक : शहरातील विविध भागात असलेल्या पडक्या उद्यानांमधील परिसराचा ताबा अनेक ठिकाणी मद्यपींनी घेतला आहे. रात्रीच्या सुमारास परिसरात मद्यपींचा वावर वाढला आहे. रात्री अंधाराचा फायदा घेत येथे अनेक मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो. याप्रकरणी संबंधित विभागातील कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
महाबळ चौकातील सिग्नलकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार
नाशिक : रविवार कारंजाकडून टिळक पथाकडे मार्गक्रमण करताना अनेक दुचाकीस्वार व्यायामाचार्य महाबळ चौकातील सिग्नलवर थांबत नाहीत. तसेच अनेक नागरिक शालिमारकडून रविवार कारंजाकडे जाण्यासाठी येथील एकेरी रस्त्याच्या नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. शहरातील हा महत्त्वाचा सिग्नल असून, सातत्याने वर्दळ सुरू असते. या चौकात वाहतूक पोलीस दिसत नसल्यामुळे तर बेशिस्त वाहनधारकांचे चांगलेच फावत आहे. पोलिसांनी अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सिडकोतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
नाशिक : शहरातील सिडको भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
वाढत्या उन्हाने नागरिक त्रस्त
नाशिक : मार्च महिन्यात सकाळी दहापासूनच ऊन तापू लागल्याने, तसेच वातावरणातील उकाडा वाढू लागल्याने नागरिक त्रस्त होऊ लागले आहेत. वाढत्या उन्हाने दुपारी घराबाहेर पडणे शक्य होईनासे झाले आहे. त्यामुळे उन्हाचा परिणाम प्रत्येक सामान्य नागरिकाला सहन करावा लागत आहे.