सिन्नर : नायगाव-सिन्नर रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करावे, अन्यथा नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डे खोदणार असल्याचा इशारा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांना निवेदन देण्यात आले आहे.नायगाव ते सिन्नर या १३ कि.मी.चा सुमारे दोन किलोमीटर रस्ता वगळता उर्वरित रस्ता अरुंद असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साईडपट्ट्या तुटलेल्या असून खड्डेमय बनलेल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करून एकाच वेळी नूतनीकरण करावे, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच खड्डे खोदून आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, भाऊसाहेब केदार, नितीन गिते, अनिल दिघोळे, विजय दिघोळे आदी उपस्थित होते.अरुंद रस्त्यामुळे अपघातगेल्या पाच वर्षांपासून या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले असून काही लोकांचा अपघातात नाहक बळीही गेलेला आहे. अवजड वाहनांचीही वर्दळ आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारक व प्रवाशांना जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागतो.