रस्त्यावरील ज्या खड्डयाचे डांबरीकरण करण्यात आले होते ते खड्डे पुन्हा उखडले आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’ च झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक - पुणे महामार्गाला जोडलेला नांदूरशिंगोटे ते लोणी हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्ता सर्वाधिक खराब झाला होता. नांदूरशिंगोटे पासून जिल्हाहद्दीपर्यंत सुमारे अडीच किलोमीटर अंतरात प्रंचड खड्डे पडले होते. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.नाशिक - पुणे रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यापासून नांदूरशिंगोटे लोणी रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. आमदार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर तालुक्यातील ज्या रस्त्यांची दुरावस्था झाली होती, त्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करून देखभाल दुुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. डिसेंबर २०१७ मध्ये रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरुवात केली होती. जागोजागी खड्डे भरतांना व्यवस्थित पध्दतीने भरण्यात आलेले नाही, ओबडधोबड कामे, रस्त्याची वरचेवर मलमपट्टी करून थातूरमातूर खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. या रस्त्याने वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. अडीच किलोमीटरच्या अंतरावर काही ठिकाणी अर्धवट साइडपट्टया ठेवण्यात आल्या आहेत. ज्या खड्डयांचे डांबरीकरण करण्यात आले आहे ते पुन्हा आठ महिन्यांत उखडण्यास प्रारंभ झाला आहे. नांदूरशिंगोटे ते लोणी मार्गावरील रस्त्यांना पुन्हा खड्डे पडले असल्याने वाहनचालक व प्रवाशांना याचा त्रास अवघ्या आठ महिन्यात सोसावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना लक्ष न दिल्याने रस्त्याची पुन्हा दुरावस्था झाली आहे.
नांदूरशिंगोटे-लोणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 5:52 PM