संकेत शुक्ल, नाशिक : लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी नसून ती सत्ता राखण्यासाठी सुरू असलेली केविलवाणी धडपड आहे. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी महिलांना त्यांना मतदान करावे लागेल, असा समज महिलांमध्ये असल्याने सत्ता लाडकी असल्यानेच त्यांनी महिलांसाठी योजना आणल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. शुक्रवारी (दि. ९) पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे आले असता त्यांनी हा आरोप केला.
जागावाटपासंदर्भात निकष काय असावे, प्राथमिक चर्चा आम्ही केली आहे. पुढच्या बैठकीत आम्ही आणखी खोलात चर्चा करून जागा निश्चिती करू. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्या जागा लढणार असल्याचेही ते म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या क्रॉस वोटिंगवर कारवाईचा प्रस्ताव हाय कमांडला दिलेला आहे, परंतु निर्णयाबद्दल त्यांनी अजून कळवलेलं नाही. राज्यात तिसरी आघाडी तयार होत असल्याबद्दल विचारले असता ही तिसरी आघाडी महायुती पुरस्कृत आहे. आमच्या महाविकास आघाडीचे मत कमी करण्याची धडपड ते करीत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला.
बेपत्ता लाडकी बहीण शोधाराज्यात बेपत्ता बहीण योजना राबविण्यासाठी सत्ताधारी पुढाकार घेत आहेत; मात्र राज्यातून बेपत्ता होत असलेल्या लाडक्या बहिणींचे प्रमाण वाढले आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार. विधिमंडळात हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला असता, आम्हाला समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आयएएसच्या परीक्षेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार होत आहे. अशा प्रकारे चुकीची माणसे जबाबदार पदांवर जाऊन पोहोचत असतील तर हा प्रकार चिंताजनक असल्याचेही ते म्हणाले.
खड्डे कायम राहतीलनाशिक-मुंबई प्रवासाची इतकी वाईट परिस्थिती कधीही पाहिली नव्हती. सरकारचं नागरिकांच्या प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. आम्ही मागच्या वर्षी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे रस्ता चांगला करू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही ते पूर्ण झालेले नसल्याने प्रवासी प्रचंड नाराज आहेत. असेही ते म्हणाले.