पंचवटी : संपूर्ण देशभरात कोरोना रु ग्ण आढळून येत असून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील शेकडो नागरिकांना अन्नधान्याची अडचण येऊ नये यासाठी शासनाने शिधापत्रिकाधारकांना डाळ, तेल यांसारख्या वस्तू मिळाव्यात यासाठी योजना जाहीर केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात धान्याचा पत्ताच नसल्याने रेशन दुकानदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, अशा तक्रारी करण्यात येत आहे. पंचवटीत असलेल्या रेशन दुकानातून प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ याप्रमाणे वाटप केला जात आहे तर कुटुंबातील सदस्यांची संख्या शिधापत्रिकेवर नोंद केलेली आहे व आधार कार्डला लिंक असेल तरच त्या संख्येनुसार प्रतिव्यक्ती मोफत तांदूळ दिला जात आहे, तर दुसरीकडे केंद्र शासनाने काही दिवसांपूर्वी रेशन दुकानात डाळ, तेल मिळेल अशा केलेल्या घोषणेनुसार प्रत्यक्षात शिधा पत्रिकाधारकांना फक्त तांदूळ मिळत असल्याचे रेशन दुकानदारांनी सांगितले.केंद्र शासनाने घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात रेशन दुकानात डाळ, तेल या वस्तू पोहोचलेल्या नाही त्यामुळे शिधा पत्रिकाधारकांना देणार कसे अशी कैफियत रेशन दुकानदारांनी मांडली आहे. आगामी आठवडाभरात किंवा एक तारखेपासून केसरी कार्डधारकांना ८ रु पये किलो गहू तर १२ रु पये किलो तांदूळ दिला जाणार आहे. आधार कार्डवर धान्य वितरण करण्याबाबत शासनाचे कोणतेही लेखी आदेश नाही. त्यामुळे सध्या आधार कार्डवर धान्य वाटप करता येत नाही. गेल्या दोन दिवसांपासून अन्नसुरक्षावाल्यांना मोफत पाच किलो प्रतिव्यक्ती तांदूळ दिला जात असल्याने रेशन दुकानात कधी होत नव्हती इतकी गर्दी मोफत तांदूळ घेण्यासाठी नागरिकांची होतआहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे मात्र मोफत तांदूळ घेण्यासाठी गर्दी करत असल्याने नागरिकांना वारंवार विनंती करावी लागत आहे.
योजना ढीगभर; धान्यच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 9:26 PM