हवामान विभागाने १०४ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, मान्सूनपूर्व पावसाने खरिपाची तयारी सुरू झाली आहे. पाऊस वेळेवर येईल असा अंदाज असल्याने नियोजन यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकर्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कोरोना महामारीमुळे शेतीशाळा यंदा शक्य नसल्याने ऑनलाइन व प्रत्यक्ष भेटीतून खरिपासाठी मार्गदर्शन सुरू आहे. चांगले पीक येण्यासाठी शेतकर्यांना त्यांच्याकडील विविध पिकांच्या बियाणांची उगवणक्षमता तपासण्याचे मार्गदर्शन केले जात आहे. अतिवृष्टीमुळे तूर, मूग, उडीद या पिकांचे नुकसान झाले. त्यांचेही उत्पन्न कमी आले होते. तथापि, बाजारपेठेत कडधान्याचे दर टिकून राहण्यासाठी कडधान्य लागवडीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहित केले जात आहे. मुगाची गतवर्षी इतकीच ८८८ हेक्टरवर, ७९९ हेक्टरवर उडीद, तर ४७१ हेक्टरवर तुरीची लागवड अपेक्षित आहे. गतवर्षी १५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. तथापि, यंदा १३ हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे.
गतवर्षी सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकर्यांनी मका व बाजरीची लागवड वाढविण्याकडे कल दिला. यंदाच्या वर्षी २७ हजार ५३० हेक्टरवर बाजरीची पेरणी, तर ११ हजार ९६१ हेक्टरवर मक्याची लागवड अपेक्षित आहे.
इन्फो...
सोयाबीन बियाणांचा तुटवडा
दोन वर्षांपासून अतिपावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. त्याचा परिणाम यंदाच्या लागवडीवर होणार आहे. बाजारात सोयाबीनचे पुरेसे बियाणे उपलब्ध होण्यात अडचणी असल्याचे कृषी विभागाकडून शेतकर्यांना सांगण्यात येत आहे. त्यावर मात करण्यासाठी शेतकर्यांनी स्वतःकडील सोयाबीनचे बियाणे वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याची उगवणक्षमता तपासून वापरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.