शीतल सांगळे यांची माहिती : स्टेडियम समिती बैठकनाशिक : जिल्हा परिषदेच्या मालकीचे महात्मा गांधी रोडवरील १२ गाळ्यांचे परवाना नूतनीकरण लवकरच होणार आहे. हे परवाना नूतनीकरण केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या महसुलात लाखो रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर १२ गाळे उभारून ते ९९ वर्षांच्या करारावर अत्यल्प दराने १२ भाडेकरूंना देण्यात आले होते. या भाडेकरूंचा आणि जिल्हा परिषदेचा करार १९९४ साली संपुष्टात आला होता. जिल्हा परिषदेने हे भाडे वाढवून मागितल्यानंतर त्याविरोधात काही गाळेधारक न्यायालयाची पायरी चढले होते. मात्र आता हे गाळेपरवाना नूतनीकरणाचे भिजत घोंगडे कायम ठेवण्याऐवजी त्यातून काही तरी मार्ग काढून जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढावे, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सोमवारी (दि.११) त्यांच्या कक्षात संबंधित गाळेधारक, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, अॅड. पाटील यांच्या उपस्थितीत स्टेडियम समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेने या भाडेकरांना ‘लिव्ह अॅन्ड लायसन्स’ तत्त्वावर हे १२ गाळेधारकांचे भाडे करारनामे केले आहेत.आता या भाडेकरार नाम्यांचे नूतनीकरण करून जिल्हा परिषद व गाळेधारक यांचे संयुक्त करारनामे करून त्यांच्याकडून भाडे आकारणी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक बोलविण्यात आली आहे. हा भाडेकरार नूतनीकरण झाल्यास जिल्हा परिषदेच्या सेस महसुलात वाढ होणार असल्याचे अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांचे म्हणणे आहे.
गाळे कराराचे होणार नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:55 PM