त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. रोज हजारो भाविक त्र्यंबक नगरीत येत असतात. या परिसरातील अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पर्वतांचेही धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र, उंच आणि घनदाट जंगलात असलेल्या या पर्वतांच्या ठिकाणी जाणे भाविक तथा पर्यटकांना या जाणे शक्य होत नसल्याने अंजनेरी - ब्रह्मगिरी यादरम्यान रोपवे तयार करावा, या मागणीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार केला असून रोपवे प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षणाकरिता कन्सल्टंट एजन्सी नेमण्याबाबत शासनाने आदेश काढले असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.त्र्यंबकेश्वर परिसरात अंजनेरी आणि ब्रह्मगिरी ही ऐतिहासिक स्थळे असून आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा घनदाट जंगलाचा आहे. अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या दोन्ही पर्वतांचे धार्मिक इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असले तरी या पर्वतांवर जाण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने भाविकांना तेथे जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात. या ठिकाणी रोपवे झाल्यास पर्यटक तसेच भाविक अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पवित्र स्थळांना भेट देऊ शकतात. तसेच चित्रपटांचे चित्रीकरण होऊन हा परिसर आणखी विकसित होऊ शकेल. या सकारात्मक विचारातून या ठिकाणी रोपवे उभारण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट या कंपनीने या मागणीचा सकारात्मक विचार केला असून अंजनेरी- ब्रह्मगिरी यादरम्यानच्या रोपवेच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला आहे. यातूनच अंजनेरी - ब्रह्मगिरीदरम्यानच्या प्रस्तावित रोपवे प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्याकामी सविस्तर प्रॉजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी केंद्र सरकारने कन्सल्टंट एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांकडून निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पायाभूत सुविधांचा अभावअंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असून ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान शिवशंकर यांनी जटा आपटल्याने त्या ठिकाणाहून गोदावरी मातेचा उगम झालेला आहे. या दोन्ही उंच पर्वतांवर जाण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने अंजनेरी, ब्रह्मगिरी ही ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहे. अंजनेरी-ब्रह्मगिरी या ऐतिहासिक पर्वतांना जोडणारा रोपवे झाल्यास पर्यटनाला निश्चितच मोठी चालना मिळणार आहे.