महानगरपालिका बांधकाम विभागाचा कारभार नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी संभाजी स्टेडियमसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक रस्त्याच्या मधोमध मोठ्या भगदाड पडल्याचे वाहनधारकांना दिसून आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतिश पाटील, समीर सुर्वे, योगेश यादव, सागर त्रिभुवन, अभिजीत नायर, योगेश दारकोंडे यांनी त्या ठिकाणी बॅरिकेटस लावले पडलेल्या खड्ड्याभोवती दगडविटा रचल्याने, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांच्या सदर बाब वेळीच लक्षात घेऊन सावधानता बाळगली. एवढे होऊनही दिवसभरात महानगरपालिका बांधकाम विभागाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी या ठिकाणी फिरकले नाही. बांधकाम विभागाच्या कारभारावर वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या असल्या, तरी त्याकडे सोपस्कारपणे डोळेझाक केले जात आहे. रस्त्याच्या दुरवस्थेस जबाबदार असलेल्या बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला नगरसेवक कावेरी घुगे, गोविंद घुगे यांनी केली आहे. (फोटो ०९ खड्डा)
फोटो ओळी : संभाजी स्टेडियम समोर रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भगदाडामध्ये नागरिकांनी लावलेले रोपटे.