नाशिक : भगवान गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्त झाली त्या बोधीवृक्षाची एक फांदी त्रिरश्मी लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात होणार आहे. त्रिरश्मी लेणी येथील बुद्धस्माकराच्या परिसरात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी बुद्धस्मारकाची पाहणी करून कामकाजाच्यादृष्टीने सूचना केल्या. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून उपासक येणार असल्याने त्यांना आवश्यक असणा-या सोयी-सुविधांचे सूत्रबद्ध नियोजन करण्यात यावे अशा सूचना भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रह्मदेश, मलेशिया, जापान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था व इतर सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात यावे, सभेचे नियोजित स्थळी खड्डेभरणी, सपाटीकरण व इतर तांत्रिक अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्याबाबतच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी अधिकारी व अभियंत्यांना दिल्या.
बोधीवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व असून इ.स.पूर्व २५६६ वर्षांपूवी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावर बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे हे बोधीवृक्ष अतिपूजनीय आहे. पुढे सम्राट अशोक यांच्या मुलांनी या बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेच्या देवानामप्रिय तिरस यांच्या हस्ते अनुराधापूर येथे स्थापित केली. याच बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिक शहरात करण्यात येणार असल्याने शहराच्या ऐतिहासिक महत्त्वात भर पडणार असल्याची माहिती शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदन्त सुगत यांनी यावेळी दिली.