नाशिक : गोदावरीही स्वच्छ पाण्याने सतत वाहत राहावी यासाठी या वर्षी अंबड रोटरीने पुढाकार घेऊन नदीपात्राच्या एका बाजूला म्हणजे कन्नमवार पूल ते तपोवन पूल असे रांगेत १८० देशी झाडे लावली.
यात शिशिर, काटेसावर, जंगली बदाम, कदंब, कळम, पारसवड, भोकर, आसाना, काळा शिसम व हळदू या औषधी झाडांचा समावेश आहे. या उपक्रमात नाशिकचे वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी शेखर गायकवाड यांनी सर्व झाडांविषयी शास्त्रीय माहिती देऊन वृक्ष लागवडीसाठी मार्गदर्शन केले. आपले राज्यफूल हे तामण असल्याचे त्यांनी सांगितले.
अश्विनी भट यांनी एकूण ८० झाडे, तर १०० झाडे रोटरी अंबडने प्रायोजित केली. नदी ही आपल्या देशाची जीवनरेखा मानली जाते. कुंभमेळ्यात गोदावरीचे आणि शहराचे अनन्यसाधारण महत्त्व वाढते. पूर्वी बारा महिने वाहती राहणारी गोदावरी आता फक्त पावसाळ्यातच दुथडी भरून वाहते. नदीचे आयुष्य जंगलावर अवलंबून असते, म्हणजे झाडांमुळे पावसाचे पडलेले पाणी धरून राहत असल्यानेच नदी बारा महिने जिवंत राहते. या बाबी लक्षात घेऊन निसर्गाप्रती आपले उत्तरदायित्व निभावण्याच्या या उपक्रमात अध्यक्ष प्रसाद जाधव, सचिव नितीन थोरात, माजी प्रांतपाल दादा देशमुख, उमेश कोठावदे, जयंत पवार, दीपक तावडे, संतोष भट व प्रकल्प प्रमुख डॉ. धनंजय अहिरे यांनी श्रमदान केले. पंडित देशमुख, राजू भालेराव, सागर दळे यांनी विशेष सहकार्य केले.