-------------------------------
कुपोषित बाळांसाठी पोषण महा नवसंजीवनी ठरवतेय!
त्र्यंबकेश्वर : कमी वजन असलेल्या नवजात शिशूंसह कुपोषित मानल्या गेलेल्या मातांचे आरोग्य सुधारावे, अती तीव्र कुपोषित असलेले व कमी वजनाची बालके व त्यांच्या ग्रामीण तसेच उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने कुपोषण महायोजना सुरु केली. कुपोषित बालक व माता यांना ही योजना म्हणजे एक प्रकारची नवसंजीवनीच ठरत आहे.
सध्या तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण कमी आहे. मागच्या महिन्यात ११ कमी वजनाची बालके व त्यांच्या माता दाखल होत्या. या महिन्यात अवघी दोनच बालके त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ डाॅ.राजेंद्र दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहेत. मुलांना पोषण महाराज अंतर्गत दररोज तीन ते चार अंडी, राजगिरीचे लाडू, वरणभात, पोळी भाजी असा आहार असतो. मुलांच्या मातांकडून योगा करुन घेतला जातो. रुग्णालयाच्या परसबागेत औषधी झाडांची लागवड केली आहे. पोषणमहा आहार रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ पल्लवी महाजन यांच्या देखरेखीखाली तयार करुन रुग्णालयात दाखल केलेली कमी वजनाच्या कुपोषित बालकांना व त्यांच्या मातांना दिला जातो याशिवाय महिलांची बुडीत मजुरी देखील दिली जाते. त्र्यंबकेश्वर तालुक्यात या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.