गावातून कर रूपाने गोळा होणारी रक्कम म्हणजे ग्रामनिधी. त्यातून पाणी योजनांचे वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार व इतर खर्च भागवावे लागतात. त्यातून वृक्षसंवर्धनासाठी खर्च करणे जिकिरीचे ठरत असताना शिंगाशी ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एक हजार वृक्षांची लागवड करण्याच्या निर्णय घेतला आहे.
शासनाला सृष्टीवर खरेच हिरवाई निर्माण करायची असेल तर या मोहिमेचे सध्याचे नियोजन बदलून योग्य उंचीची रोपे ग्रामपंचायतला पुरवून वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. रोपवाटिकांना अनुदान, वृक्षलागवडीनंतर संवर्धनासाठी स्वतंत्र निधी देणे आदी उपाययोजना केल्यास वृक्षलागवड मोहीम यशस्वी होईल, असे मत ग्रामसेवक रामराव महाजन यांनी यावेळी व्यक्त केले.
वृक्षलागवडीसाठी रोपे तयार करणे, रोपे रोपवाटिकेतून आणण्यासाठी वाहतूक, झाडे लावण्यासाठी खड्डे करणे आदी बाबींवर खर्च केला जातो. कागदावर वृक्षलागवडीचे आकडे आणि प्रत्यक्षातील काम यात तफावत असली तरी शिंगाशी ग्रामपंचायतीने प्रत्यक्षात एक हजार वृक्षांची लागवड करून तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. त्यात पेरू, चिंच, अशोक, सीताफळ, जांभूळ, निंब अशाप्रकारे एक हजार वृक्षांची लागवड केली आहे. यावेळी सरपंच नामदेव भोये, उपसरपंच मन्साराम पवार, पोलीसपाटील दशरथ गावीत, ग्रामपंचायत सदस्य काशीराम गावीत, रमेश भोये, बेबीबाई गावीत, गंगूबाई पवार, ललिता बिरारी ग्रामसेवक रामराव महाजन, भिवराज गावीत, गणपत चौधरी, राजू कुवर, संगीता कुवर उपस्थित होते.
शासनाने कॉन्टीटीपेक्षा क्वॉलिटीला महत्त्व देणे गरजेचे असून, ग्रामनिधीतून ग्रामपंचायतींचा कारभार चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. त्याच निधीतून पुन्हा वृक्षसंवर्धनाच्या कामाची अपेक्षा केली जात आहे. त्याऐवजी शासनाने ग्रामपंचायतींना वृक्षसंवर्धनासाठी स्वतंत्र निधी द्यावा.
- आर. के. महाजन, ग्रामसेवक