लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : पर्यावरणाची काळजी घेतलीच पाहिजे अन्यथा आपल्या पुढच्या पिढीला जगणेदेखील मुश्कील होईल, अशी प्रतिक्रिया येवला शहरवासीयांनी व्यक्त केली आहे. शहरातील गटारी आणि नाल्यांमधून प्लॅस्टिक पिशव्यांचे उदंड पीक आल्याचे सध्या पहावयास मिळत आहे. यामुळे पावसाळ्यात गटारीतून पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. प्लॅस्टिकबंदी ही गांभिर्याने घेण्याची मागणी होत आहे. आता सक्तीने प्लॅस्टिक निर्मूलन नव्हे तर प्लॅस्टिक विक्र ीसह वापरावर संपूर्णत: बंदी आणण्याची गरज शहरवासीयांनी अधोरेखित केली आहे. प्लॅस्टिकला अन्य पर्याय देऊून वापर व विक्रीवर बंदी आणून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईचे हत्यार उपसावे अशी मागणीदेखील नागरिकांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना केली आहे. नागरिकांनी व्यावसायिकांकडून प्लॅस्टिक पिशवीची मागणीच करू नये. बाजारात खरेदीसाठी जाताना स्वत:कडील कापडी पिशवी घेऊन जावी, असे आवाहन रवींद्र पवार यांच्यासह अनेकांनी केले. प्लॅस्टिक निर्मूलनासंदर्भात बैठकांमधून कडक शब्दांत चर्चा कागदपत्रावर आली असली तरी पालिकेत ठरावावर ठराव होतात. शहरवासीयांची नकारात्मक मानसिकता प्लॅस्टिक निर्मूलनाच्या आड येत असल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय येवला पालिकेच्या कायदा अंमलबजावणीत सातत्य नाही.विघटन न होणाऱ्या ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याच्या ठरावाबाबत चर्चा झाली. अनेकवेळा कागदोपत्री फार्स झाला. आतापर्यंत अनेकवेळा संबंधिताना नोटिसादेखील बजावण्यात आल्या. शिवाय पालिकेने संबंधितांकडून दंडदेखील वसूल केला आहे. असे असले तरी प्लॅस्टिक पिशवीचा वापर कमी करण्याची मानसिकता शहरवासीयांमध्ये तयार होत नाही. येवलेकरांना पर्यावरणाशी काही एक देणे घेणे नसल्याचा अनुभव यातून येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरावासीयांशी लोकमतने संवाद साधला. यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत.विविध दुकानांमधून प्लॅस्टिकच्या ५० मायक्र ॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या राजरोसपणे विकल्या जात आहे. भाजीपाला विक्रेत्यांसह, किराणा व मेडिकल दुकांनातून प्लॅस्टिक पिशव्याचा वापर होत असल्याचे चित्र आहे. येवला शहरात ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर व चहाच्या प्लॅस्टिक कप विक्रीवर बंदी घालण्याबाबत पालिका सभागृहात आरोग्य व स्वच्छता विभागाची अनेकवेळा बैठका झाल्या. कारवाई झाली. तरीही मानवी जीवन व पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. बाजारात सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी केवळ कागदावर!
By admin | Published: May 15, 2017 10:26 PM