नाशिक : कोरोनाच्या निर्बंधामुळे मोफत शिवभोजन थाळी दिली जात असून, या योजनेचा लाभ हजारो नागरिकांना झाला आहे. रोजगार आणि रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गोरगरिबांना शिवभोजन थाळीने मेाठा दिलासा दिला आहे. मात्र दुसरीकडे शिवभोजन थाळीचे केंद्रे चालविणाऱ्यांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. जिल्ह्यात एक महिना उशिराने अनुदान प्राप्त होत असल्याच्या संचालकांच्या तक्रारी आहेत.
मागीलवर्षी लॉकडाऊनमध्ये पाच रूपये इतक्या अल्पदरात शिवभोजन थाळी देण्यात आली होती तर यंदा मोफत योजना राबविण्यात आली. त्याचा लाभ जिल्ह्यातील हजारो नागरिकांना झाला. मात्र जिल्ह्यातील १३८ केंद्रांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याने त्यांच्याकडून वेळेवर अनुदान मिळण्याची मागणी होत आहे. इतर जिल्ह्यांमध्ये अनुदानासाठी केंद्र संचालकांना प्रतीक्षा करावी लागत असतांना नाशिक जिल्ह्यात मात्र त्या तुलनेत केवळ एका महिन्याची बिले थकली आहेत.
--इन्फो--
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रे : १३८
एप्रिल-मे मधील थाळ्यांची संख्या : ५,३३,८८४
--इन्फो--
प्रतिथाळी ४५ रुपये अनुदान
शहरी भागासाठी प्रति थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रति थाळी ३० रुपये शासन अनुदान देत आहे. शिवभोजन थाळीच्या उद्दिष्टामध्ये वाढदेखील करण्यात आली आहे. वेळेत वाढ करण्यात आली असून, सकाळी ११ ते ३ यावेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवभोजन थाळीच्या उद्दिष्टांमध्ये दिडपट वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे केंद्रांना मंजूर असलेल्या थाळ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे.
--इन्फो--
अनुदानाची प्रतीक्षा कायम
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये शिवभोजन केंद्रांना देण्यात येणारे अनुदान वेळेत दिले जात असून, त्यासाठीचा पाठपुरावा केला जात असल्याने जिल्ह्यात केंद्र संचालकांच्या फारशा तक्रारी नाहीत. मोफत थाळी असल्याबरोबरच संख्यादेखील वाढविण्यात आल्यामुळे प्रतिसाददेखील चांगला आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्यांमध्ये १३८ केंद्रांच्या माध्यामातून शिवभोजन थाळी पुरविली जात आहे. दिवसाला सात हजार याप्रमाणे शिवभोजन थाळी वितरित केली जात आहे. सध्या पार्सलच्या माध्यमातून ही सुविधा दिली जात आहे.
--कोट--
दोन दिवसांत अनुदान वर्ग होणार
नाशिक जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र संचालकांना वेळेत अनुदान देण्यात येत आहे. याबाबतच्या कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. एप्रिलपर्यंतचे अनुदान केंद्रांना देण्यात आले असून, पुढील दोन दिवसांत मे महिन्याचेदेखील अनुदान मिळेल.
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
--कोट--
शासनाने गरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू केली आहे. शासनाकडून आजवर वेळेत अनुदान उपलब्ध झाले आहे. गेल्या दोन वर्षांत अनुदानाबाबतची कोणतीही अडचण आलेली नाही.
- दीप्ती हिरवे, तनिष्का स्वयंसाहाय्यता गट