नाशिक : सध्या शारीरिक क्रीडाप्रकार कमी होत असून, त्यामुळे नाशिक विभागात ‘चला खेळू या’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्याने कविता राऊत, ताई बामणे यासारखे अनेक गुणवंत खेळाडू दिले असून, जिल्ह्यात असंख्य प्रतिभावंत खेळाडू निर्माण होऊ शकतात. यासाठी ग्रामपंचायतींना प्राप्त होणाºया विविध प्रकारच्या अनुदानातून गावातील गावठाण जमिनीवर मैदान तयार करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहभागी स्पर्धकांनी संचलन करून मानवंदना दिली. या स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष नयना गावित, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, शिक्षण व आरोग्य सभापती यतिंद्र पाटील, अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर उपस्थित होते. अध्यक्ष सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, श्रीमती प्रतिभा संगमनेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, कार्यकारी अभियंता बापू साळुंके यांच्यासह जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) आदी उपस्थित होते.सुमारे दीड हजार विद्यार्थीजिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेत १५ तालुक्यांतील सुमारे १,६४१ विद्यार्थी सहभागी झाले असून, हे विद्यार्थी विविध प्रकारच्या मैदानी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यामध्ये ४५९ च्या वर स्पर्धक हे दिव्यांग आहेत. त्यांच्यासाठी देखील स्पर्धेचा वेगळा गट ठेवण्यात आला आहे. त्यांनाही इतर मुलांप्रमाणे स्पर्धेची संधी मिळावी यासाठी त्यांच्यासाठी स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.
गावठाणांमध्ये मैदाने विकसित करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:24 AM