राजेंद्र पवार
पिंपळगाव बसवंत : नौकानयन या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावणारा जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील दत्तू भोकनळ याचीच प्रेरणा घेत निफाड तालुक्यातील नारायणटेंभी येथील शेतकरी कन्या पूजा हिरामण गवळी हिनेही नौकानयनमध्ये प्रावीण्य कमावण्याची जिद्द उराशी बाळगली आहे. शेतीकाम करून नौकानयनमध्ये नावलौकिक कमावण्यासाठी पूजाची सुरू असलेली धडपड पंचक्रोशीत कौतुकाचा व चर्चेचा विषय बनली आहे.प्रतिकूल स्थिती असतानाही केवळ शिकण्याची जिद्द असलेली पूजा गवळी ही परिस्थितीशी दोन हात करत नौकानयनमध्येही हात-पाय मारताना दिसत आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावाशेजारी नारायणटेंभी हे एक लहानसे खेडेगाव. या गावात राहणारी एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी पूजा हिरामण गवळी. याच गावात प्राथमिक शिक्षण घेऊन तिने पुढील शिक्षण पिंपळगाव बसवंत येथे केले.
सध्या एम.कॉम.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेली पूजा उत्तम प्रकारे नौकानयन करते. यासाठी तिला पिंपळगावचे क.का. वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. लहानपणीच मातृछत्र हरपलेल्या पूजाचा सांभाळ तिच्या मोठ्या आत्याने केला. नौकानयन जसे आनंद देणारे आहे तसे ते धोकादायकही आहे. त्यामुळे पूजाला नौकानयनसाठी अगोदर घरातून विरोध झाला होता. पण तिच्यातील शिकण्याची जिद्द व आवड पाहून वडिलांनी तिला प्रोत्साहन दिले. पूजा महाविद्यालयाकडून भोपाळ व दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी झाली असून आता ती राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी करत आहे.इन्फोशेतीकाम अन् शिक्षणहीपूजा सकाळी साडेसहा वाजता नारायणटेंभीवरून पिंपळगावला कादवानदीच्या तिरावर महाविद्यालयाने केलेल्या बोटिंग पॉइंटवर दररोज सरावासाठी येते. तिथे इतरही ज्येष्ठ मुले व मुली आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेते व नियमित सराव करते. त्यानंतर महाविद्यालयात जाऊन आल्यानंतर घरी तिच्या वडिलांना शेतीकामात मदत करते. वडिलांना ट्रॅक्टर चालवता येत नसल्याने ती स्वतः ट्रॅक्टरने द्राक्षबागेला औषध फवारणी करते, शेताला पाणी भरते. आरोग्याचे महत्त्व जाणणारी पूजा परत पिंपळगावला जिमला जाते. नवीन काहीतरी शिकण्याची तिची धडपड व कष्ट करण्याची तिची तयारी पाहून तिला प्रोत्साहनही मिळत आहे.