नाशिक : नाट्य आणि चित्रपट कथालेखक दत्ता पाटील यांना मुंबईतील चैत्र चाहूल संस्थेच्या वतीने ‘चैत्र चाहूल रंगकर्मी सन्मान’ समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. लेखक किरण नगरकर यांच्या हस्ते दत्ता पाटील यांना गौरविण्यात आले.मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात रविवारी (दि.१८) झालेल्या समारंभात दत्ता पाटील यांना २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र, चैत्र चाहूल परिवाराचे विनोद पवार, पॉप्युलर प्रकाशनचे विनायक गवांदे यांच्यासह खासदार विनय सहस्त्रबुद्धे, शफाअत खान, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, चित्रकार अविनाश गोडबोले आदी उपस्थित होते. यावेळी, दत्ता पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, गेली पंधरा वर्ष रंगभूमीसाठी काम करतोय. आपल्या परिघातल्या प्रेक्षकांपलीकडे फार कुणाचे लक्ष नसेल आपल्याकडे, असे मला वाटले होते. पण या दिग्गज मंचाकडून दिल्या गेलेल्या पुरस्कारामुळे आनंद झाला खरा, पण टेन्शन जास्त आलंय. आपल्याकडे खूप लोकांचं लक्ष असल्याची भावना माझ्यासारख्या गावाकडच्या माणसाला जरा बुजरं बनविते. खाली प्रचंड गर्दीच्या नजरा आपल्याला न्याहाळत असतानाही तारेवर लीलया पलीकडे तोल न ढळू देता पोहोचणाऱ्या डोंबाºयाइतकी कमावलेली व्यावसायिक चतुराई माझ्यात नाही. कारण दोरीवरून तोल सांभाळत पलीकडे जात राहणं ही माझी गरज आहे, कसरत नाही. त्यामुळे खालून एक जरी टाळी वाजली, तरी भान हरपून तोल जायची भीती मला वाटत राहते. हा पुरस्कार मात्र तोल जाऊ देणारा नाही. हा पालवी फुटल्याचं भान देणारा अर्थात- ‘ही सुरुवात आहे,’ अशी वास्तववादी जाणीव करून देणारा पुरस्कार आहे. म्हणून मला या पुरस्काराचं अप्रूप आहे. हा पुरस्कार मी एक नवखा विद्यार्थी म्हणून शिष्यवृत्ती समजून स्वीकारतोय, अशी भावनाही पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाटील यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले.
नाटककार दत्ता पाटील यांना ‘रंगकर्मी सन्मान’ प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 3:07 PM
मुंबईतील चैत्र चाहूल संस्थेच्या वतीने ‘चैत्र चाहूल रंगकर्मी सन्मान’
ठळक मुद्देलेखक किरण नगरकर यांच्या हस्ते दत्ता पाटील यांना गौरविण्यात आले२५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित