नाशिक : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय अर्थात आठवी ते दहावीतील चारपैकी एका विद्यार्थ्यास तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असल्याची गंभीर बाब नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे़ या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात प्रतिदिन ५३० मुले तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास सुरुवात करतात़ तंबाखूच्या व्यसनापासून विद्यार्थी दूर राहावेत यासाठी ‘प्लेज फॉर लाइफ’ हे राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले असून, त्यात आठ जिल्ह्यांतील २५ हजार विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली आहे़ महाराष्ट्रातील सुमारे २६ लाख विद्यार्थी या तंबाखूविरोधी मोहिमेचे संदेशदूत बनले असून, राज्यातील सर्व शाळांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१७ (गेट्स) नुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सुमारे (२़४) अडीच कोटी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यामध्ये दोन कोटी लोक हे तोंडावाटे तंबाखूचे सेवन करतात तर ४० लाख धूम्रपान करणारे आहेत़ त्यांच्या व्यसनाचा परिणाम व्यसनकर्त्याप्रमाणे निर्व्यसनी लोकांच्या आरोग्यावर होतो़ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाºया आजारांमुळे महाराष्ट्रात ४५ हजार लोकांचा मृत्यू होतो.शासनाचा शालेय शिक्षण विभाग आणि संबंध हेल्थ फाउंडेशनतर्फे ‘प्लेज फॉर लाइफ’ हे राष्ट्रीय अभियान राबविले जात असून, त्यातून विद्यार्थ्यांना तंबाखूविरोधी माहितीपट दाखवून जागृती केली जात आहे. सोबत तंबाखूविरोधी सामूहिक शपथ घेत शाळा आणि समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रेरित केले जाते.२६ लाख विद्यार्थी संदेशदूत‘प्लेज फॉर लाइफ’ या अभियानानुसार जळगाव (८ लाख ५१ हजार ९४७), अकोला (२ लाख ३७ हजार), अमरावती (३ लाख ८० हजार), नागपूर (२ लाख ४ हजार), चंद्रपूर (१ लाख ९७ हजार १९२), बुलढाणा (१ लाख ४० हजार २७५) तर वर्धा (७६ हजार ९८४) विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. या माध्यमातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची तंबाखूविरोधी मोहीम आखण्यात आली असून शपथ घेतलेले २६ लाख विद्यार्थी या मोहिमेचे संदेशदूत असणार आहेत. राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून तंबाखूच्या व्यसनामुळे आरोग्यावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी शिक्षक आणि विध्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित त्यांची एक साखळी निर्माण केली जाणार आहे. लहान वयातील मुलांपासून जागृती केली जाणार असून, विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावेत यासाठी त्यांना माहिती दिली जाणार आहे. सुरक्षित व तंबाखूमुक्त विद्यार्थ्यांसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहभागाने तंबाखू सेवन विरोधी संदेशाबाबत जनजागृती केली जाईल़ - विशाल सोळंखी, आयुक्त, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य
‘प्लेज फॉर लाइफ’ राष्ट्रीय अभियान: विद्यार्थ्यांची तंबाखूविरोधी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:46 AM