नाशिक : चतुर्थीच्या मुहूर्तावर गुरूवारी (दि.१३) गणरायाचे मंगलमय वातावरणात वाजत गाजत शहरात घरोघरी आगमन होणार आहे. नाशिककर गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी गणेश भक्तांकडून करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या पुर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत गणरायाच्या प्रतिष्ठापनेची लगबग पहावयास मिळाली. बहुतांश भाविकांनी आपल्या पसंतीची गणेशमुर्तीची आगाऊ नोंदणी केल्याचे दिसून आले. सकाळपासून तर दुपारपर्यंत ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त असल्याचे पंचांगकर्त्यांनी सांगितले.विघ्नहर्ता गणरायाचे अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व आहे. गणरायाच्या पूजनाने प्रत्येक पूजाविधीला प्रारंभ केला जातो. संपुर्ण गणांचा नायक असलेल्या गणनायकाने अनेक आसुरी शक्तींचाही नाश केल्याचे शास्त्रात म्हटले आहे. त्यामुळे हिंदू धर्मात गणरायाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. दरवर्षी विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव मोठ्या भक्तीपूर्ण अशा मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. यावर्षीदेखील गणेशोत्सवाचा मोठा उत्साह शहरात पहावयास मिळत आहे. गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी सुर्याेदयापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत मुहूर्त आहे. प्रतिष्ठापनेसाठी भद्रा योगाचा दोष मानू नये. सकाळी स्नान आटोपल्यानंतर गणरायाची मुर्ती लाल वस्त्रामध्ये झाकून घरी आणावी आणि विधीवत पध्दतीने पूजन करुन प्रतिष्ठापना करावी, असे गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले.
मंगलमय वातावरण : चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी सकाळची वेळ उत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 7:04 PM
दरवर्षी विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव मोठ्या भक्तीपूर्ण अशा मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. यावर्षीदेखील गणेशोत्सवाचा मोठा उत्साह शहरात पहावयास मिळत आहे.
ठळक मुद्देगणपतीला लाल रंग प्रिय जास्वंदची फुले, शमीची पाने, दुर्वाचा प्रतिष्ठापना करताना पूजेत समावेश करावागणरायाची मुर्ती लाल वस्त्रामध्ये झाकून घरी आणावी