नाशिक : नाशिकरोड येथील मार्केट कमिटीतील एका कर्मचाऱ्याने मंगळवारी नाशिकरोडच्या जिल्हा बॅँक शाखेतून साडेचार लाख रुपये काढून ते मार्केटच्या सभापतीच्या घरी पोहोचविल्याचा सनसनाटी आरोप करून बाजार समितीचे संचालक शिवाजी चुंभळे यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी पकडलेली ५७ लाखांच्या रकमेची सखोल चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली आहे. चुंभळे यांनी यासंदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पोलिसांनी पकडलेल्या गाडीत ५७,७३,८०० इतकी बेहिशेबी रक्कम होती. ज्या दिवशी गाडी पकडली त्यादिवशी दहा ते बारा कर्मचाऱ्यांनी त्याच बॅँकेतून पैसे काढले आहेत. असे असताना मार्केटचे कर्मचारी व बॅँकदेखील मार्केटच्या आवारात असल्यामुळे लेखापालला बॅँकेतून पैसे काढण्याची गरज नव्हती. दि. २६ आॅक्टोबर रोजी ९३ कर्मचाऱ्यांनी स्वत: जाऊन बॅँकेतून पैसे काढलेले आहेत, जर अन्य कर्मचारी बॅँकेत जाऊन पैसे काढू शकतात तर मार्केटचे अरविंद जैन, विजय निकम, चिखले यांनी अन्य कर्मचाऱ्यांचे पैसे बॅँकेतून काढण्याचा संबंधच येत नाही. ज्या ११७ कर्मचाऱ्यांच्या नावाने ही रक्कम वटविण्यात आली, ते कर्मचारी कोणत्या महत्त्वाच्या कामात गुंतले होते की त्यांना बॅँकेत जाण्यास जमले नाही, असा सवालही चुंभळे यांनी केला आहे. २५ आॅक्टोबर रोजी अरविंद जैन, निकम व चिखले यांनी बॅँकेतून जे पैसे काढलेले आहेत, ते महागाई भत्ता व बोनसच्या टक्केवारीनुसार कर्मचाऱ्यांकडून कोरे चेक घेऊन व सर्व चेक ज्ञानेश्वर मांडे, एम. एम. निकाळे या दोनच जणांच्या हस्ताक्षरात लिहिलेले आहेत व त्याची रक्कमदेखील राउंड फिगरमध्ये आहेत. याचाच अर्थ हे पैसे टक्केवारीच्या प्रमाणात काढण्यात आल्याचे चुंभळे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)गौडबंगाल : कार्यालय उशिरापर्यंत सुरू कसे?बॅँक व बाजार समितीचे अंतर एक किलोमीटर इतके असून, प्रत्यक्षात पोलिसांनी गणेशनगरच्या पुढे तवली फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पकडली, ही गाडी पंचवटी मार्केटकडे यायला हवी होती, परंतु गाडीची दिशा पाहता ती दरी-मातोरी रस्त्याने जाणार असल्याचा आरोप करून, बॅँकेची कार्यालयीन वेळ साडेचार वाजेची असताना सहा वाजता कोणाच्या अधिकारात पैसे काढण्यात आले, त्याचबरोबर बाजार समितीची वेळदेखील साडेपाच वाजेची असताना इतक्या उशिरा कोणत्या कर्मचाऱ्यांना पैसे देण्यासाठी चालले होते, असा सवालही चुंभळे यांनी केला.
बाजार समितीच्या रकमेची चौकशी करा
By admin | Published: October 28, 2016 10:59 PM