पंचवटी : नाम स्वयं नारायण म्हणजे ईश्वर आहे. मंत्र, सदगुरू आणि परमात्मा ही तीन तत्त्वे नामसाधनेत महत्त्वाची आहेत. गुरुवर विश्वास ठेवल्याने मन:शांती लाभते. प्रत्येक साधकाने नामजपात तल्लीन होऊन भजनाची कास धरावी. जीवनाचे कल्याण होण्याचा मार्ग अध्यात्म असून, नामसाधनेतून सुख प्राप्त होते, असे प्रतिपादन कनकेश्वरी देवी यांनी केले. हिरावाडीरोडवरील बाप्पा सीताराम मंदिरासमोर श्री सदगुरू सेवा समितीच्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्याच्या पाचव्या दिवशी कनकेश्वरी बोलत होत्या. श्रीराम कथा नामजप साधना विषयावर बोलतांना त्या पुढे म्हणाल्या की, साधकाने नामनिष्ठ, भजननिष्ठ असावे असा संदेश अनेक साधू-संतानी दिला आहे. साधकाने नामनिष्ठा, सत्संगनिष्ठा व ईश्वर निष्ठेपासून कधीही दूर जाऊ नये. नामजप व गुरु भक्तीने ईश्वर प्रसन्न होतो. सततची साधना, मनन, भजन पूजनाने मन:शांती मिळते. बालपणापासूनच नामसाधना केल्यास अनेक लाभ होतात. नामसाधनेने अनेक प्रकारच्या भ्रमावर मात करता येते. नाम हे देवतेचे विशेष रूप असल्याने हरिनाम घेताना व नाम साधना करताना आळस करू नये, असे त्या म्हणाल्या.
नामसाधनेतून खºया अर्थाने सुख प्राप्ती : कनकेश्वरी देवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 1:23 AM