कंधाणे : येथील शिवमंदिर ते वरदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असुन रस्त्याला ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असून रस्त्यावरची संपुर्ण खड्डी उघडी पडली आहे.
हा रस्ता येथील आदिवासी नागरिक वस्तीला लागून असून येथील नागरिकांना वापरण्याचा मुख्य रस्ता असल्याने या भागातील नागरिकांना रोज जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याची अनेक वेळा कैफियत मांडून रस्ता दुरूस्तीचे साकडे संबधितांना घातले, पण या रस्त्याच्या नशिबी अजूनही नुतनीकरणाचा मुहूर्त लागला नसून, नेहमी येथील नागरिकांना लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत संबंधितांकडून डांबरीकरणाचा शब्द मिळत असताना प्रत्यक्षात मात्र आज ही हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे.या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. येथील शिवमंदिर ते वरदर या सुमारे तीन किमी अंतराचा रस्ता येथील आदिवासी नागरिकांचा व शेतकऱ्यांचा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता परिसरातील गावांचा कळवण तालूक्याला जोडणारा मुख्य राजरस्ता असुन परिसरात असलेल्या तिळवण किल्ल्यावर भेट देण्यासाठी जाणा-या पर्यटकांचा वापराचा मुख्य रस्ता आहे. पण रस्त्याची दुर्दशा पाहून नागरिक या रस्त्यावर जाणे टाळत आहेत. गावातील नागरिकांना वाहतूकीसाठी या रस्त्यावरून दररोज जा ये करावी लागते. पण या रस्त्यावर संपुर्ण खड्डी उघडी पडली असून भरपूर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे छोट्या-मोठ्या अपघाताची मालिका रोज घडत आहे.२०१२ मध्ये तात्कालिन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या रस्ता दुरूस्तीची कैफियत मांडली होती. नागरिकांचे हाल लक्षात घेता तत्कालीन आमदार जयवंत जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून ३१ लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानूसार देवी मंदिर ते वरदर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पण त्यावेळी हा राहिलेला अंदाजीत तीन किमी रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे, तो कायमचाच.या रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा कैफियत मांडून ही संबधितांकडून आदिवासी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे डोळे झाक केली जात आहे. निवडणुकीत हा प्रश्न नेहमीच मांडला जातो. मात्र निवडणूकीची ढामढूम संपताच हया रस्त्याचा प्रश्न बाजूला सारला जातो व लोकप्रतिनिधी व नागरिकांना ही याचा विसर पडतो.आदिवासीवस्तीला लागून असलेला हा रस्ता येथील नागरिकांचा मुख्य रस्ता आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची संपुर्ण खड्डी उखडलेली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात दररोज अपघाताची मालिका सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना रस्ता डांबरीकरणासाठी अनेकवेळा साकडे घातले, पण याकडे डोळे झाक करण्यात आली आहे. विधानपरिषदेचे सदस्य असलेले एक आमदार कंधाणे गावासाठी 31 लक्ष रूपयांचा निधी देतात पण स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्ना कडे डोळे झाक करतात या रस्त्याचे लवकरच डांबरीकरण करण्यात यावे.- भास्कर बिरारी, कंधाणे.