याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवळगाव येथील आदिवासी समाजामधील गरीब घरातील दोन अल्पवयीन मुलींचा विवाह येवला तालुक्यातील कासारखेडे व सावरगाव येथील विवाहेच्छुक तरुणाशी लावून देण्याचा प्रयत्न झाला. रवळगाव येथील एक महिला व येवला तालुक्यातील एजंट दशरथ गंगाधर पवार (रा. सावरगाव) यांनी या दोन मुलींना त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीविना फूस लावून पळवून नेत कासारखेडे येथे घेऊन गेले व तेथील दोन मुलांशी तुमचा विवाह लावून देतो, असे आमिष दाखवीत त्याबदल्यात तुमच्या कुटुंबीयांना आम्ही काही पैसे देतो, असे सांगितले. याची कुणकुण रवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गोकुळ टोगारे, सोमनाथ निंबेकर व रवळगावच्या ग्रामस्थ यांना लागली. त्यांनी या दोन मुलींच्या घरी जात संबंधित महिला व दोन्ही वराकडील कुटुंबीयांना पकडून ठेवत दिंडोरी पोलिसांच्या हवाली केले. यात अमोल दशरथ पवार, सुनीता दशरथ पवार, अक्षय दशरथ पवार, योगेश गोरक्षनाथ घेगडे, वाल्मीक माधव घेगडे, गोकुळ सखाराम जाधव, सागर पोपट, गायकवाड, संजय निवृत्ती घेगडे, गोरख सखाराम घेगडे, एकनाथ अशोक गायकवाड, रामेश्वर संजय गायकवाड, रामदास नामदेव गायकवाड, जनाबाई गोरक्षनाथ घेगडे, सीमा ज्ञानेश्वर बोरसे, ज्ञानेश्वर काशीनाथ बोरसे (सर्व रा. कासारखेडे, ता. येवला) तसेच अण्णा बारकू मलिक, मीना अण्णा मलिक (रा. दहेगाव, ता. नांदगाव) आणि वाहन चालक कासम राजू पठाण (रा. विसापूर, ता.येवला) या २० जणांचा समावेश आहे.
इन्फो
पैशाचे आमिष दाखवून पळविले
सदर गुन्ह्याची खबर दिंडोरी पोलिसांना मिळताच दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण व त्यांचे कर्मचारी यांनी रवळगाव येथे जाऊन या २० वऱ्हाडींना ताब्यात घेतले. मध्यस्थांनी पैशाचे आमिष दाखवून हा बालविवाह घडविण्याचा प्रयत्न केला. दिंडोरी पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध मुलींच्या वडिलांनी फिर्यादीनुसार भादंवि कलम ३६३, ३६६ (अ ) १४३,१४७,१४९ व ३५४ सह पोक्सो तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व अन्य २ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कळवणचे उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे करीत आहेत.