नाशिक : दोन पादचारी युवकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिघांनी मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि़ १८) रात्रीच्या सुमारास पाइपलाइन रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे़
बालाजी कांबळे (ईशांत प्लाझा, पाइपलाइन रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास ते आपल्या साथीदारासह एचडीएफसी बँकेसमोरून पायी जात होते. यावेळी संशयित श्रावण ऊर्फ चिना पुंजा मोंढे, आकाश ऊर्फ सोनू शालिक भालेराव व शुभम देवराम निंबाळकर (तिघेही रा. आनंदवली) यांनी अडविले़ यापैकी मोंढे याने खिशातील मोबाइल बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला़, तर उर्वरित दोघांनी डोळ्यात मिरची पूड टाकली़
यानंतर संशयित भालेराव याने आपल्याकडील धारदार हत्याराने वार तर निंबाळकर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त बापू बांगर, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे व पोलीस उपनिरीक्षक पाळदे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती़