नाशिक - विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा गुरुवारी (19 सप्टेंबर) समारोप होत आहे. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. दुपारी 12 वाजता पंचवटीतील तपोवनात ही सभा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी अकरा वाजता ओझर मधील एचएएलच्या विमानतळावर विमानाने येतील. तेथून सभास्थळी ते हेलिकॉप्टरने येणार आहेत. सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतीलच परंतु त्यांच्या शिवाय केंद्रीय सार्वजनिक वितरण व मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पंकजा मुंडे, विनोद तावडे, राम शिंदे, जयकुमार रावळ आदींसह अनेक मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचाराचे रणशिंगच नाशिकमध्ये फुंकणार असल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.
नाशिक शहरात बुधवारपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे त्या पार्श्वभूमीवर तपोवनातील वीस एकर क्षेत्रावर वॉटर प्रुफ मंडप टाकण्यात आले आहेत. सुमारे पाच लाख नागरिक याठिकाणी येतील असा अंदाज आहे. त्या दृष्टीने सभास्थळी नियोजन करण्यात आले आहे. सभेच्या परिसरात वाहने आणण्यास मनाई करण्यात आली असून सभेच्या अगोदरच असलेल्या मोकळ्या जागांवर वाहनतळ उभारण्यात आले आहेत. सभेच्या ठिकाणी कडेकडोट बंदोबस्त असून ड्रोन आणि तत्सम हवाई साधनांना मनाई करण्यात आली आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रा बुधवारी (18 सप्टेंबर) नाशिकमध्ये दाखल झाली. शहरातील पाथर्डी फाटायेथे फडणवीस यांचे स्वागत केल्यानंतर त्यांनी भर पावसात रोड शो केला होता.
मोदींचा नाशिक दौरा; चोख सुरक्षा व्यवस्था तैनात
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी स्वत: शहरातील महाराष्ट्र पोलीस अकादमीत दाखल होत पोलीस आयुक्त, पोलीस महानिरिक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत सूक्ष्म नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत. मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरासह धुळे, जालना, सांगली, जळगाव यांसह विविध जिल्ह्यांचे सुमारे 12 बॉम्ब शोधक-नाशक पथक सर्व लवाजमा घेऊन दाखल झाले आहेत. या पथकांच्या जवानांनी तपोवनासह सभास्थळाचा मंगळवारपासूनच ताबा घेतला असून हा संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. यासह गुन्हे शोध पथकाचे विशेष श्वान पथकदेखील मुंबई येथून शहरात दाखल झाले आहे. श्वानांच्या मदतीने सभास्थळाची बारकाईने पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यानुसार मोदी यांच्यासह सर्वच महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडताना सुरक्षा यंत्रणा सभेच्या ठिकाणी दिसून येत आहे. मोदी यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दलाच्या कमांडोची (एसपीजी) तुकडी तैनात राहणार आहे.