पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी नाशिक येथे आयोजित केलेल्या २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. नरेंद्र मोदींचे नाशकात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
दर्शन घेतल्यानंतर नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमास्थळी हजर झाले. यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी नरेंद्र मोदींना महाराष्ट्राची संस्कृती असणारा फेटा घातला व शाल दिली. यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी नरेंद्र मोदींच्या खांद्यावर असणारी शाल खाली पडण्याची शक्यता होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी लगेच ती पकडली व शाल खाली पडण्यापासून रोखली. यानंतर नरेंद्र मोदींनी लगेच एकनाथ शिंदेंचे कौतुक केले व पाठीवर थाप दिली. एकनाथ शिंदेंनी देखील स्मितहास्य करत नरेंद्र मोदींचे आभार मानले.
नाशकात युवकांचा मोठा कुंभ होत असून हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. भगवान राम, लक्ष्मण, सीता पंचवटीत येऊन गेले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशकात आले हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील राममंदिर होत आहे, हा प्रत्येक देशवासियांचे स्वप्न पूर्ण होत आहे. ‘मोदी है तो मूमकीन है’चा असे सांगत देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही. याचे सर्व श्रेय पंतप्रधानांना जाते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अटल सेतूचे ३.३० वाजता करणार उद्घाटन
मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात अटल सेतूच्या लोकार्पणासह सूर्या प्रकल्प आणि उरण-नेरूळ रेल्वेमार्गासह सुमारे ३० हजार ५०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमारास अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा सेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून, प्रवाससुद्धा करणार आहेत.