धनंजय रिसोडकर, नाशिक : महाराष्ट्रातील काळाराम मंदिरात ‘भावार्थ रामायण’ ऐकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यात श्रीवीरभद्र मंदिरातील दर्शनासोबतच ‘रंगनाथ रामायण’ ऐकले. तर केरळ दौऱ्यात श्रीगुरुवायुर मंदिरासह श्रीरामास्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले तेथेही त्यांनी मल्याळम भाषेतील भजन व ‘आध्यात्मिक रामायण’ श्रवण केले. आता २० आणि २१ तारखेला ते तामिळनाडूत जाणार असून या दौऱ्यात ते ‘कंब रामायणा’चेही श्रवण करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन पंचवटी भूमीतील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. तसेच तिथे संत एकनाथ महाराजांच्या मराठी भाषेतील भावार्थ रामायणाचे श्रवण करीत काही काळ भजनदेखील केले होते. त्या दिवसापासून त्यांनी अनुष्ठानास प्रारंभ करीत असल्याचेही जाहीर केले. त्यानंतर त्यांनी थेट आंध्र प्रदेश दौऱ्यात श्रीवीरभद्र मंदिरातील दर्शनासोबतच ‘रंगनाथ रामायण’चे श्रवण केले होते. तसेच रामायणातील दृश्यांवर आधारित कठपुतळ्यांचा खेळदेखील पाहिला होता.
आता पंतप्रधान मोदी हे २० जानेवारीपासून दोन दिवस तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा ते तामिळनाडूतील काही महत्वाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील. तसेच या मंदिरात विविध विद्वानांव्दारे होणाऱ्या कंब रामायणातील श्लोकांचे श्रवणही पंतप्रधान करणार आहेत.