नाशिक : अन्य राष्ट्रांचे नेते जातील तेथे आपल्या तंत्रज्ञानाची मार्केटिंग करीत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातून खरेदीचा धडाका लावला आहे. ते परदेशात चेकबुकच खिशात घेऊन फिरत असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. एका व्याख्यानासाठी नाशिकमध्ये आले असता, पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी नरेंद्र मोदींचा कारभार आशावादी वाटत नसल्याचे सांगितले. केंद्र सरकार हे टीम म्हणून काम करीत नसून, सर्वत्र मोदींची एकाधिकारशाही सुरू आहे. नियोजन आयोगासारखी सरकारची ‘थिंक टॅँक’ असलेली संस्था मोदींनी बरखास्त केली. उद्योगांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. विज्ञान व तंत्रज्ञानातील गुंतवणूक प्रचंड वाढवणे गरजेचे असताना, मोदींना फक्त परराष्ट्र धोरणातच रस आहे. परदेशात जाताना ते खिशात चेकबुक घेऊनच फिरतात. फ्रान्सकडून केलेली राफेल विमानांची खरेदी असो की, चीनशी अब्जावधी डॉलर्सचे करार असोत, मोदी फक्त वाटायला निघाले आहेत. देशातील परकीय गुंतवणुकीतही वाढ झाली नसल्याने ‘मेक इन इंडिया’चा फुगा फुटला आहे, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली. नरेंद्र मोदी हे अद्यापही स्वत:ला गुजरातचे मुख्यमंत्रीच समजत असून, त्यामुळे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातकडे पळविले जात असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. मोदी हे देशाचे पंतप्रधान असून, त्यांनी सर्वांना समान न्याय द्यायला हवा. अहमदाबादचा विकास साधण्यास कोणाचा विरोध नाही; पण तो विकास मुंबईची किंमत मोजून होऊ नये. या प्रकाराला कॉँग्रेस कडाडून विरोध करील, असे सांगतानाच मुख्यमंत्री फडणवीस मात्र याविषयी काहीच बोलत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान परदेशात चेकबुक घेऊन फिरतात: पृथ्वीराज चव्हाण यांची नरेंद्र मोदींवर टीका
By admin | Published: May 19, 2015 1:02 AM