नाशिक : ‘मी आईला भाकरी करताना पाहिले आहे’, ‘आयुष्याच्या पुस्तकातली बरीच पाने कुरतडलेली’, बॅचलर दार उघड मनाचं आदी कविता, गझल आणि शेर शायरीच्या सादरीकरणाने ‘मु. पो. कविता’ कार्यक्रम रंगला. प्रारंभी निवेदक संजय शिंदे यांनी कवी किशोर पाठक यांच्या ‘कवितेचे दिसणे म्हणजे आपण नसणे, गर्भात उमलते मूल मानाश हसणे’ कवितेने सुरुवात झालेली काव्यमैफल राज्यभरातून सहभागी झालेल्या कवींनी त्यांच्या रचना सादर करून उत्तरोत्तर रंगत भरली. कुसुमाग्रज स्मरकात रविवारी (दि.२७) मराठीतील जुन्या नव्या पिढीच्या कविसंमेलनात कवि सतीश सोळांकूरकर यांनी ‘मी आईला भाकरी करताना पाहिलेले आहे’ कवितेतून आई आणि मुलाच्या नात्यातील वात्सल्य उलगडून दाखवले, तर श्रीपाद जोशी यांच्या ‘उशाला जणू माळलेले तुला मी, तुझा गंध अद्याप ना ओसरे’या काव्याने सभागृहात प्रिया मिलनाचा प्रेमगंध दरळवला. उस्मानाबादेच्या प्रथमेश उगावकर यांनी ‘पूर्वी इतके पुन्हा पुन्हा मी निरखून वैगरे पाहत नाही, आयुष्याच्या पुस्तकातली बरीच पाने कुरतडलेली, तुझ्या नाव्याच्या पानांना का किडा वैगरे लागत नाही, ही गझल सादर केली. जळगावचे कृ पेश महाजन यांनी ‘डेथ आॅफ सोल’ कवितांचे सादरीकरण केले, तर नाशिकचे कवी प्रथमेश पाठक यांनी कॉर्पोरेट कवितेचे सादरीकरण केले. गझलकार बंडू अंधरे यांनी तरन्नूममध्ये ‘राहिला आयुष्यभर बाबा तिच्या कर्जामध्ये, पेरल्या होत्या मुलीच्या अक्षता शेतामध्ये’ सादर केलेल्या शायरीने दाद मिळवली. कल्याणच्या विशाखा विश्वनाथ यांनी ‘बॅचलर दार उगड मनाचं, मला संवादाची भूक लागलीय’ ही नव्या पिढीची प्रेमसंवेदना व्यक्त केली. योगीनी राऊळ यांनी ‘घर की दुकान’ कवितेतून स्त्रीच्या अव्यक्त भावनांना व्यक्त केल्या.
कुसुमाग्रज स्मारकात रंगला कवितांचा मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:53 AM